बनावट वायरची निर्मिती व विक्री करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:27+5:302021-02-09T04:13:27+5:30
पुणे : पॉलिकॅब कंपनीच्या नावाने बनावट इलेक्ट्रिक वायर बनविणारे व ती विक्रीसाठी मागविणाऱ्यांमधील महत्त्वाच्या वाहतूकदारास फरासखाना पोलिसांनी अटक केली ...
पुणे : पॉलिकॅब कंपनीच्या नावाने बनावट इलेक्ट्रिक वायर बनविणारे व ती विक्रीसाठी मागविणाऱ्यांमधील महत्त्वाच्या वाहतूकदारास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.
रमेशकुमार अमरसिंग कोंडल (वय ४६, रा. हडपसर, मूळ रा. हिमाचल प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पूर्वी दिनेशसिंग रुपसिंग राजपुरोहित (वय ४२, रा. शुक्रवार पेठ) याला अटक केली आहे. विनोदकुमार श्रीजयचंद करपासिया (वय ३९, रा. दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. राजपुरोहितच्या गोडाऊनवर छापा टाकून बनावट वायर, पॅकिंगसाठी लागणारे कंपनीच्या नावाचे बॉक्स व अन्य साहित्य असा ४३ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्यात एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. वायर, गॅस शेगडी, रेग्युलेटर, एलपीजी गॅस पाइप आणि कुकर अशा बनावट मालाची आरोपी वाहतूक करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्या अनुषंगाने कोंडलकडे चौकशी करायची आहे. अधिकृत कंपनी वायर व बॉक्स वेगवेगळे पाठवत नाही, हे माहिती असतानाही कोंडल याने त्याच्या ट्रान्सपोर्टच्या मदतीने त्या मालाची वाहतूक केली. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.