'माणूस'कार श्री.ग माजगावकर पुरस्कार शेषराव मोरे यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 09:50 PM2020-07-20T21:50:33+5:302020-07-20T21:51:22+5:30
महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने लेखन करणारे विचारवंत , ज्ञानोपासक अथवा अभ्यासक यांना सन्मानित करण्याच्या हेतूने गतवर्षीपासुन हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली.
पुणे : राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील वैचारिक लेखनाचा प्रवाह समृद्ध करणारे ज्येष्ठ अभ्यासक शेषराव मोरे यांना जाहीर झाला आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राविषयी सजग असणा-या श्री. ग. माजगावकरांनी १९६१ साली 'माणूस' साप्ताहिक सुरु केले. जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्यासाठी 'माणूस' चा प्रारंभ झाला. समाजासहित आपली उन्नतीसाधा - अभिराष्ट्रेण वर्धताम हे 'माणूस'चे ध्येयवाक्य होते. आत्मनिर्भर राष्ट्रवाद आणि सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक समतावाद या दोन प्रेरणांचासमन्वय साधण्यासाठी विविध विचारधारांना श्री. ग. मा. खुल्या मनाने सामोरेगेले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 1 ऑगस्ट रोजी श्री.ग माजगावकरयांच्या जयंतीदिनी महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने लेखनकरणारे विचारवंत , ज्ञानोपासक अथवा अभ्यासक यांना सन्मानित करण्याच्या हेतूने गतवर्षीपासुन हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली . २०१९ ते२०२९ अशी ११ वर्षे हा पुरस्कार देण्यात येईल. श्री. ग. माजगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे २०२९ मध्ये या पुरस्काराची सांगता होईल. या वर्षी महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ अभ्यासक शेषराव मोरे यांना हा पुरस्कार दिला जाणार असून, 40,000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे,अशी माहिती डॉ. डॉ. रा. चिं. ढेरेसंस्कृति-संशोधन केंद्रातर्फे देण्यात आली आहे.
मराठी साहित्यविश्वात परखड विचारांचे लेखक अशी शेषराव मोरे यांची प्रतिमा आहे. वाचकानुनय न करता अथक व्यासंग आणि चिंतनातून त्यांचे लिखाण साकारले आहे. सावरकरांचे जीवन हा मोरे यांच्या लिखाणाचा आवडता विषय. त्यांनी
'सावरकरांचा बुद्धिवाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सत्य आणि विपर्यास' या पुस्तकांतून सावरकरांच्या मौलिक विचारांची परखड मीमांसा केली आहे.याशिवाय १८५७ चा जिहाद,इस्लाम मेकर आॅफ अ मुस्लिम माईंड, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला, काश्मीर एक शापित नंदनवन,गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी, प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्शखलिफा आणि मुस्लिम मनाचा शोध ही त्यांची पुस्तके गाजली आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजहंस प्रकाशनने श्री.ग माजगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणा-या पुरस्काराची संपूर्ण जबाबदारी डॉ. रा.चिं.ढेरे संस्कृति-संशोधनकेंद्राकडे सोपविली आहे. महाराष्ट्रातील एखादा अभ्यासक किंवाविचारवंतांना हा पुरस्कार दिला जातो. त्यानुसार यंदाच्या वर्षी माज्यासहडॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. नीलिमा गुंडी यांच्या निवडसमितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभ्यासक शेषराव मोरे यांची निवडकेली आहे. मात्र दि. 1 आॅगस्टला कोणताही कार्यक्रम न करता त्यांना घरगुतीस्वरूपात हा पुरस्कार दिली जाईल- डॉ. अरूणा ढेरे, डॉ. रा. चिं. ढेरेसंस्कृति-संशोधन केंद्र