पुणे महापालिकेच्या तब्बल ११० नगरसेवकांनी दर्शविला पुन्हा 'स्वच्छ'ला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 02:12 PM2021-02-23T14:12:39+5:302021-02-23T14:13:03+5:30
स्वच्छ ही सहकारी संस्था गेले अनेक वर्ष पुणे शहरात कचरा गोळा करण्याचे काम करते.
पुणे : पुणे महापालिकेतील ११० सर्व पक्षीय नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेतला पाठिंबा दिला आहे. एकीकडे नगरसेवकच इतर संस्थांना काम दिले जावे याबाबत आग्रही असताना हा पाठिंबा संस्थेसाठी महत्वाचा मानला जात आहे.
नगरसेवकांनी प्रस्तावित खाजगी संस्थांच्या ऐवजी कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ सहकारी संस्थेचे काम यापुढेही सुरु ठेवण्यास पाठिंबा दर्शवणारे पत्र मा. महापालिका आयुक्त व मा. महापौरांना लिहिले आहे. आज २३ फेब्रुवारी रोजी, ३५०० कचरा वेचकांनी नागरिकांकडून घेतलेल्या सह्या असलेला २५,००० पानांचा अहवाल कचरावेचक संचालक मंडळानी महापौरांना दिले.
स्वच्छ ही सहकारी संस्था गेले अनेक वर्ष पुणे शहरात कचरा गोळा करण्याचे काम करते. कचरावेचक आणि महापालिकेने सुरु केलेल्या या सहकारी संस्थेच्या काम द्यायला काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. खासगी ठेकेदारांनाही या संस्थेच्या कामकाजात सहभागी केले जावे असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. या पार्श्वभुमीवर स्थायी समितीने स्वच्छला १ महिन्यांची मुदतवाढ देत नंतर टेंडर काढुन नेमणुक केली जावी अशी भुमिका घेतली होती.
या पार्श्वभुमीवर स्वच्छच्या कचरावेचकांनी नगरसेवक आणि नागरिकांची मते जाणून घेतली होती. यात तब्बल ११० नगरसेवक हे स्वच्छ संस्थेच्या बाजुने असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच ६ लाखांहून अधिक नागरिकांनी स्वच्छला पाठिंबा दिला आहे.
स्वच्छच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष सुमनताई मोरे म्हणाल्या, "आम्हाला कचरा वेचकांना प्रत्यक्ष भेटून ११० नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात स्वच्छचेच काम पुढेही सुरु राहावे, खाजगी कंत्राटदार नको असे लेखी पत्र दिले आहे. बहुसंख्यक नगरसेवक व नागरिकांनी केवळ कचरा वेचकांना नाही तर आमच्या संस्थेला देखील पाठिंबा दिला आहे. आता आमच्या संस्थेच्या कामाविषयी नेमकी तक्रार कुणाची आहे हा प्रश्न आम्हाला पडला आहे. आम्ही कचरा वेचक खाजगीकरणाचा नेहमी विरोधच करू, कारण खाजगी कंत्राटदारीतील त्रासाचा व अन्याय्य वागणुकीचा आम्हाला चांगला अनुभव आहे”.
सुप्रिया भडकवाड म्हणाल्या, "स्वच्छ म्हणजे आम्हीच. ही आमची संस्था आहे. इथे कचरा वेचकांच्या हक्कांना, आरोग्याला व उपजीविकेला प्राधान्य दिले जाते. आमच्यासाठी गरजेच्या काळात आर्थिक मदत, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आमच्यासाठी आरोग्य विमा यासारखी हित जपणारी कामे स्वच्छ संस्थेमार्फत आम्ही आमच्या बहिणींसाठी करतो. कोणताही खाजगी कंत्राटदार कचरा वेचकांना प्राधान्य देऊन आमच्यासाठी अशी कामे कधीही करणार नाही.”
यानंतर आता महापालिकेचे पदाधिकारी काय भुमिका घेतात ते पहावं लागेल.