तब्बल ११ हजार कोरोना रुग्ण होते ‘नॉन ट्रेसेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:07+5:302021-06-02T04:09:07+5:30
पुणे : खासगी रुग्णालये तसेच पालिकेच्या स्वॅब सेंटरकडून मिळालेल्या अपुऱ्या माहितीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण ...
पुणे : खासगी रुग्णालये तसेच पालिकेच्या स्वॅब सेंटरकडून मिळालेल्या अपुऱ्या माहितीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण ''नॉन ट्रेसेबल'' होते. या रुग्णांचा थांगपत्ताच लागत नव्हता. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तसेच आरोग्य विभागाच्या ''कॉन्टॅक्ट ट्रेसिंग''च्या पथकांनी या रुग्णांचा शोध घेतला. या सर्व रुग्णांना निष्पन्न करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. सक्रिय रुग्णांचा आकडाही ५० हजारांच्या पुढे गेला होता. या काळात स्वॅब चाचण्या आणि अँटिजेन चाचण्या वाढविण्यात आल्या होत्या. या काळात यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला होता. पालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आलेला असला तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या कामात अडचणी येत होत्या. खासगी आणि शासकीय स्वॅब चाचणी केंद्रांवर संबंधित नागरिकांची पुरेशी माहिती घेतली जात नसल्याने अनेक रुग्णांना शोधणे यंत्रणेला कठीण गेले.
चाचणी करणाऱ्या नागरिकांचे पूर्ण नाव, पत्ते, मोबाईल क्रमांक तसेच नातेवाइकांची माहिती न घेतल्याने हे रुग्ण शोधण्यात अडचणी आल्या. अशा प्रकारचे जवळपास ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडतच नव्हते. त्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. स्थानिक क्षेत्रीय कार्यालय आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने या रुग्णांचा शोध घेतला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना चाचणी करून घेतली. त्याकरिता ‘रिपोर्टिंग सिस्टीम’ बसविण्यात आली. तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडील माहिती एकत्रित करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
------
दुसऱ्या लाटेत ४६१ रुग्ण निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह म्हणून त्यांची नोंद झाली. तर, २६४ रुग्णांची पॉझिटिव्ह म्हणून दुबार नोंदणी झाली.
------
या काळात ५ हजार ४५६ रुग्ण ‘नॉन ट्रेसेबल’ होते. तर, ६ हजार ९२ रुग्णांचा शोध घेणे शिल्लक होते. या सर्व ११ हजार ५४८ रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे.
------