आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल ७०३ मालकांची नावनोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:07 PM2021-12-30T18:07:07+5:302021-12-30T18:07:14+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे
मंचर : राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे १ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी तब्बल 703 बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली आहे. नियम व अटीचे पालन करत ही शर्यत पार पडणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर लांडेवडी ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली असून एक जानेवारीला ही शर्यत लांडेवाडी येथील घाटात पार पडणार आहे. त्यासाठी लांडेवाडी गावात बैलगाड्या मालकांची नाव नोंदणी पार पडली. नाव नोंदणीसाठी बैलगाडा मालकांची झुंबड उडाली होती.
लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढण्यात आले. या शर्यतीसाठी तब्बल ७०३ बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे नियम व अटीचे पालन करत तसेच कोरोना नियमांचे पालन करत ही शर्यत पार पडणार आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन नियम सांगितले आहेत. दरम्यान लांडेवाडी येथील श्री शितलादेवी यात्रा उत्सव निमित्त विजेत्या बैलगाडा मालकांना भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहे. सव्वा दोन लाख रुपये रोख, टीव्ही, फ्रिज, मोटर सायकल, सोन्याची अंगठी, बैलगाडा अशी अनेक बक्षिसे विजेत्या बैलगाडा मालकांना दिली जाणार आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे.