Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय
By श्रीकिशन काळे | Published: July 1, 2024 08:14 PM2024-07-01T20:14:24+5:302024-07-01T20:14:57+5:30
लोणावळ्यातून एक कुटुंब वाहून गेले तर आज पुन्हा एक तरुण धबधब्याखाली उडी मारल्याने वाहून गेला
पुणे: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे वन विभागाच्या वतीने ताम्हिणीनंतर भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० सप्टेंबर पर्यंत असणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी दिली.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर अपघात होण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागातर्फे १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पायावाटा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. भीमाशंकर अभयारण्यात धबधबे आहेत. त्या कुंडांमधील पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज पर्यटकांना येत नाही. त्यामुळे ते वाहून जाऊ शकतात. म्हणून कोंढवळ धबधबा-जाणारे सर्व मार्ग बंद, चोंडीचा धबधबा-खोपीवली क्षेत्र, न्हाणीचा धबधबा-पदरवाडीजवळ, सुभेदार धबधबा-नारीवाली क्षेत्र, घोंगळ घाट नाला-खांडस ते भीमाशंकर मार्ग, शिडी घाट-पदरवाडी ते काठेवाडी हे सर्व बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे की, ज्यामध्ये एका धबधब्याखाली एक तरूण उडी मारत आहे. त्याने पाण्यात उडी मारली आणि पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला नीट पाेहता आले नाही. त्यामुळे तो थेट वाहत पुढे गेला. त्याला कोणालाही वाचवता आले नाही. अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने वन विभागाने धबधबा ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे.
सध्या धबधब्यांच्या ठिकाणी प्रचंड पाऊस होत आहे. अपघाताचा धोका वाढल्याने आम्ही धबधबे बंद करत आहोत. ताम्हिणीसह भीमाशंकर अभयारण्य देखील बंद केले आहे. त्या ठिकाणी अवैधरित्या कोणी गेले तर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल. - तूषार चव्हाण, उपवनसंरक्षक (वन्यजीव), पुणे