कलाकारांना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक; पुणेकर म्हणतायेत, कलावंत पथक गेलं कुठं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:37 PM2024-09-18T15:37:58+5:302024-09-18T15:38:31+5:30

आम्हाला पाहण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी होत असल्याने त्या गर्दीचे मॅनेजमेंट करताना मंडळाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते, असे आमच्या ऐकण्यात आले होते

Many are eager to see the artists Pune citizens says where did the Kalawant team go | कलाकारांना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक; पुणेकर म्हणतायेत, कलावंत पथक गेलं कुठं?

कलाकारांना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक; पुणेकर म्हणतायेत, कलावंत पथक गेलं कुठं?

पुणे: पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीत पथकांच्या वादनाचे वेगळेच आकर्षण दरवर्षी दिसून येते. निरनिराळे ताल, त्यावर ठेका धरणारे नागरिक, लेझीम, यामुळे विसर्जन मिरवणुकीचा उत्साह वाढतो. पुण्यात ७०० ते ८०० ढोल पथके आहेत. विशेष म्हणजे सगळ्या पथकांना बाप्पासमोर वाजवण्याची संधी मिळते. या पथकात तरुण- तरुणी बरोबरच ज्येष्ठांचाही समावेश असतो. तर कलाकारही आवडीने या वैभवशाली मिरवणुकीत पथकात वाजवण्याची हौस पूर्ण करतात. असे कलावंत पथक यंदाच्या मिरवणुकीत दिसून आले नाही. त्यामुळे बरेच पुणेकर नाराज झाल्याचे समोर आले आहे. 
 
मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीने पुण्याच्या विसर्जनाची सुरुवात होते. दरवर्षी कलावंत पथक श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला वादन करते. यंदा मात्र ते पथक दिसलेच नसल्याने पुणेकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. कलावंत पथकात अजय पुरकर, सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे, तेजस बर्वे ही कलाकार मंडळी आहेत. यांना पाहण्यासाठी पुणेकरांबरोबरच राज्यातून येणारे नागरिक उत्सुक असतात. त्यांच्याबरोबर वादनाचा आनंदही घेतात. पण तो क्षण यंदा पुणेकरांना अनुभवता आला नाही. 

कलावंत पथक मिरवणुकीत यंदा आझाद व्यायाम मंडळाच्या मिरवणुकीत वादनाला होते. ते मिरवणुकीत सकाळपासून का आले नाहीत? याबाबत पथकाचे कलाकार सौरभ गोखले यांच्याशी लोकमतने संवाद साधला. गोखले म्हणाले, कलावंत पथक दरवर्षी मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला वादन करत असते. परंतु यंदा कसबा गणपती मंडळाला दुसऱ्या पथकाला संधी द्यायची होती. आम्ही दरवर्षी मानाच्या पहिल्या मंडळात वाजवायला आल्यावर आम्हाला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते. त्या गर्दीचे मॅनेजमेंट करताना मंडळाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. असे आमच्या ऐकण्यात आले होते. म्हणूनच आम्हाला ती सुपारी मिळाली नाही. अनेक पथकांची कसबा गणपतीसमोर वाजवण्याची इच्छा असते. त्यांनाही संधी मिळायला हवी. परंतु यंदा आम्ही वाजवण्याची संधी न सोडता सायंकाळी लक्ष्मी रोडला बहारदार वादन केले.     

Web Title: Many are eager to see the artists Pune citizens says where did the Kalawant team go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.