तुमचा हाेताे खेळ पण आमचा जाताे जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:27 PM2020-01-19T17:27:54+5:302020-01-19T17:29:08+5:30

मकरसंक्रातीला नायलाॅनच्या मांजाचा वापर करुन पतंग उडवली जात असल्याने अनेक पक्षी जखमी झाले आहेत.

many birds has been injured due to nylon manja | तुमचा हाेताे खेळ पण आमचा जाताे जीव

तुमचा हाेताे खेळ पण आमचा जाताे जीव

googlenewsNext

पुणे : मकरसंक्रांतीला पतंगबाजी केली जाते. परंतु, या पतंगबाजीचा फटका पक्षी आणि दुचाकीस्वारांना बसला आहे. काही पक्ष्यांना तर आपला जीव गमवावा लागला असून, अनेक पक्षी आता कधीही उडू शकणार नाहीत. कारण त्यांचे पंखच कापले गेले आहेत. नायलॉन मांजामुळे हे प्रकार घडत आहेत. दोरी अधिक काळ आकाशात राहून पतंग उंच उडावा यासाठी मजबूत दोरी म्हणून नायलॉनचा वापर होतो. पण हेच नायलॉन निष्पाप जीवांवर उठत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजावर बंदी घातलेली असली, तरी त्याचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. मकरसंक्रांतीलाा तर अधिक प्रमाणात हा मांजा लोक विकत घेऊन पतंग उडवताना दिसून येतात. पुणे पोलीसांनी शंभरहून अधिक ठिकाणी अशा मांजाबाबत छापे टाकल्या आहेत. पण कुठेही मांजा आढळून आलेला नाही. तरी देखील ठिकठिकाणी अशा मांजाने पक्षी आणि नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

मकरसंक्रांतीच्या दिवशी पुणे शहरात २० हून अधिक पक्षी जखमी झाले. त्यांच्यावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात उपचार करण्यात आले. तसेच काही पक्षीप्रेमींनी कात्रजला जाणे शक्य नाही म्हणून आपल्या परिसरातील पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचार घेतले. दुचाकी चालवताना अनेकांच्या गळ्यांवर मांजा अडकून ते जखमी झाले, तर काहींचा गळा कापल्याच्या घटना घडल्या आहेत. जखमी पक्ष्यांमध्ये गव्हाणी घुबड, कावळे, कबुतर, पारवे आदींचा समावेश आहे. 

वाइल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे संतोष थोरात म्हणाले,‘मकरसंक्रांतीच्या एक-दोन दिवसांपासूनच शहरात मांजामुळे पक्षी जखमी झाले आहेत. मकरसंक्रांतीला आमच्या पक्षीप्रेमींनी ८ पक्ष्यांवर उपचार केले, तर गुरूवारी आनंद अडसुळ यांनी ३ घारी, १ पोपट, श्रेयस शेट्टी यांनी १ कावळा, १ घार, मयूर दीक्षित यांनी ४ घारींवर, अक्षय लाटे यांनी एका कावळ्यावर, हेमंत शेळके २ घुबड, १ घार, शंकर बंगारी १ पारवा, १ घार आणि तेजस कडूसकर यांनी २ पारव्यांचा जीव वाचविला आहे. मी स्वत: १ घारीचे प्राण वाचविले. असे एकूण १९ पक्ष्यांवर आम्ही उपचार केले.’’

आता ते पक्षी उडतील की, नाही सांगता येणार नाही
मकरसंक्रांतीला आमच्याकडे खूप जखमी पक्षी आले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. बरेच पक्ष्यांनी आपले पंख गमावले आहेत. त्यांना आता उडता येईल की, नाही हे सांगता येत नाही. कारण सध्या थंडीने त्यांच्यात डिहायड्रेशनचे प्रमाण दिसून येते. त्यामुळे जखमी पक्ष्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
- डॉ. सुचित्रा सूर्यवंशी पाटील, पशूवैद्यकीय अधिकारी 
 

Web Title: many birds has been injured due to nylon manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.