लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणे शहरात अनेक ज्वलंत प्रश्न; २ वर्षात काहीच काम झाले नाही, नगरसेवकांनी वेधले लक्ष, 'लोक' जीबीला सुरुवात
By प्रमोद सरवळे | Published: March 5, 2024 12:14 PM2024-03-05T12:14:39+5:302024-03-05T13:18:52+5:30
वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील कचऱ्याच्या प्रश्न, मेट्रोच्या बारगळलेले काम अशा विषयांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले
पुणे : शहराच्या विकासाचा कणा असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभाच गेली दोन वर्ष अर्थात मार्च २०२२ नंतर झालीच नाही. दुसरीकडे निवडणूक रखडल्याने नगरसेवकच निवडले गेले नाहीत, परिणामी पुणेकरांचे प्रश्न प्रशासनासमोर येत नाहीत. हीच अडचण विचारात घेऊन दैनिक 'लोकमत'ने विशेष 'लोक'जीबीचे आयोजन केले आहे. बाणेर रस्त्यावरील 'यशदा'च्या सभागृहात मंगळवारी (दि. ५) सकाळी १० वाजता याची सुरूवात झाली.
आज (5 मार्च) लोकमत आयोजित लोकजीबीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत जीबीची सुरुवात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, दौलतसागर सुरीश्वर, मधुवंती पाटणकर (मेधा कुलकर्णी यांच्या आई) श्रद्धांजली वाहून करण्यात आली. या जीबीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांनी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा विषय मांडला. शहरात झालेले चुकीचे फुटपाथ, मेट्रोच्या बारगळलेल्या कामावरही ठपका ठेवला. शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाची मागणी मानकर यांनी या जीबीत केली. यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पालिकेचे माजी आयुक्त महेश झगडे उपस्थित होते
काँग्रेसचे आबा बागुल यावेळी म्हणाले, पुणे शहरात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. गेल्या दोन वर्षांपासून नाही तर 2017 पासून काहीच काम शहरात झाले नाही. बागुल यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे बागुल यांनी लक्ष वेधले. लोकमतच्या लोकजीबीमध्ये महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे यांनी प्रशासकराजच्या विरोधात पोस्टर दाखवून निषेध केला. तसेच यावेळी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे सभागृहात हातोडा घेऊन आले.