अनेक बस 'स्टॉपवर' न थांबता थेट पुढे निघून जातात; नागरिकांचा संताप, पुण्यदशमची बिकट वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:41 AM2022-08-16T09:41:47+5:302022-08-16T09:41:54+5:30
पुण्यदशम बसचा वाढता गोंधळ या प्रमुख कारणांमुळे रात्री प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे
पुणे : मुंबईची लाइफ लाइन म्हणून ज्याप्रमाणे लोकलची ओळख आहे, त्याचप्रमाणे पुण्याची लाइफ लाइन म्हणून पीएमपीची ओळख आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातून उपनगरांमध्ये जाण्यासाठी असलेल्या पीएमपीच्या बस वेळेत ये-जा करत नसल्याने तासन तास प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे, अशा तक्रारी प्रवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या आहेत.
वेळेत अनियमितता, चालक-वाहकांची नागरिकांशी अरेरावी, बस मध्येच नादुरुस्त होण्याचे वाढलेले प्रमाण, अचानक बसच्या फेऱ्या कोणाचाच धाक नसल्याने रद्द होणे, वेळेचे नियोजन नसणे, प्रवाशांनी तक्रार केली असता त्याचे समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देणे, पुण्यदशम बसचा वाढता गोंधळ या प्रमुख कारणांमुळे रात्री प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार अनेक बसथांब्यांवर न थांबता थेट पुढे निघून जातात. यामुळे पुन्हा तासभर दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते. याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे नोकरदार नागरिकांना घरी जाण्यासाठी खूप उशीर होतो. येवलेवाडी, जांभूळवाडी, नऱ्हे, आंबेगाव या ठिकाणी लोकवस्ती वाढत आहे, तसेच या भागातून शहरात येणारा कामगार वर्गदेखील अधिक आहे.
बसमध्ये आधीच सीएनजी का भरत नाही
मी शनिवारी चांदणी चौकातून नळ स्टॉपकडे येण्यासाठी बसमध्ये बसलो, बस कोथरूड डेपोमध्ये येताच वाहकाने बस अर्धा तास थांबेल, सीएनजी भरायचा आहे असे सांगितले. यावेळी मी त्याला मला बसतानाच का नाही सांगितले, अशी विचारणा केली असता, त्याने मलाच अरेरावीने बोलत बसायचे तर बस नाहीतर उतरा असे उत्तर दिले. मुळात बसमध्ये प्रवासी असताना अर्धा तास सीएनजी भरण्यासाठी बस थांबवणे चुकीचे आहे, आधीच गॅस का भरला जात नाही. - निखिल चौधरी, प्रवासी
पाच-दहा मिनिटांनी बसची सोय असताना तास-तासभर बस येत नाही
मी गेल्या वर्षभरापासून माझा अपघात झाल्याने पीएमपीने पुणे-जांभूळवाडी प्रवास नोकरीच्या निमित्ताने करत आहे. दररोज मनपा बसस्थानकावर मी पीएमपीची तासाभरापेक्षा अधिक वेळ वाट बघतो. दर पाच-दहा मिनिटांनी बसची सोय असताना तास-तासभर बस येत नाही. येणारी बस कधी-कधी थांबतदेखील नाही. त्यामुळे माझ्यासह असंख्य नागरिकांना दररोज हा त्रास सहन करावा लागत आहे. - राहुल मोरे, प्रवासी