पैसे वाटण्याच्या अनेक तक्रारी

By admin | Published: February 21, 2017 03:36 AM2017-02-21T03:36:19+5:302017-02-21T03:36:19+5:30

महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाकडे शहराच्या विविध भागांमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या

Many complaints of money sharing | पैसे वाटण्याच्या अनेक तक्रारी

पैसे वाटण्याच्या अनेक तक्रारी

Next

पुणे : महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाकडे शहराच्या विविध भागांमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या, मात्र भरारी पथकांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता त्यांच्या हाती काहीच लागले नाही. निवडणुकीसाठी उमेदवारांनी उघडलेल्या प्रचार कार्यालयांच्या झालरी, झेंडे उतरविण्याची कारवाई करण्यावर या पथकांना समाधान मानावे लागले.
महापालिका निवडणुकीसाठी सावरकर भवन येथे २४ तास आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीदरम्यान काही गैरप्रकार सुरू असल्यास अथवा आचारसंहिताभंग होत असल्याचे निर्दशनास आल्यास आचारसंहिता कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५०६६४४, ९६८९९३७६४५ यावर तक्रार करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. शहरातील १४ निवडणूक कार्यालयनिहाय भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली होती. आचारसंहिता कक्षाकडे तक्रार आल्यानंतर त्याठिकाणी तातडीने भरारी पथकांना पाठविले जात होते. रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालये व आचारसंहिता कक्षांकडे या तक्रारींचा ओघ सुरू होता.
सोमवारी दुपारी नागेश्वर मंदिर व कमला नेहरू हॉस्पिटल येथे पैसे वाटत असल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाकडे आली. त्यानंतर घोले रोडच्या निवडणूक निर्णय कार्यालयाकडून तातडीने भरारी पथक घटनास्थळी पाठविण्यात आले. या पथकामध्ये पालिकेचे अधिकारी, पोलीस व व्हिडीओ छात्राचित्रण करणारे कर्मचारी होते. भरारी पथकाने संबंधित ठिकाणाची पाहणी केल्यानंतर तिथे काहीच आढळून आले नाही. ज्यांच्याकडून पैसे वाटप करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती, त्या व्यक्तीकडे याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भरारी पथकांच्या हाती काहीच लागले नाही.
त्यानंतर एका उमेदवाराने त्याच्या कार्यालयावरील झेंडे व झालर काढले नसल्याची तक्रार भरारी पथकाकडे आली. त्यानुसार संबंधित उमेदवाराच्या कार्यालयात जाऊन त्यांना ते काढण्याची सूचना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी केली. त्या वेळी समोरच असलेल्या विरोधी पक्षातील उमेदवाराच्या कार्यालयावरही झालर आणि झेंडे असल्याचे भरारी पथकाला सांगण्यात आले. त्यानुसार त्या विरोधी पक्षातील उमेदवारालाही ते काढण्यास सांगण्यात आले.

Web Title: Many complaints of money sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.