कोरोना उपचाराच्या खर्चाने अनेक कुटुंब कर्जबाजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:02 AM2021-07-13T04:02:18+5:302021-07-13T04:02:18+5:30
मेडद : बारामती तालुक्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयानक होती. दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक ...
मेडद : बारामती तालुक्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयानक होती. दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक बाधित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. काही गावांतील संपूर्ण कुटुंबच बाधित झाल्याचे चित्र होते. त्यामुळे या दुसऱ्या भयानक लाटेचा फटका मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरीवर्गाला ही चांगलाच बसला आहे.
अनेक नागरिकांना ऑक्सिजन बेडपासून ते उपचारासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची जुळवाजुळव करताना प्रचंड फरपट झाली. काहींनी उपचारासाठी मुलीच्या लग्नकार्यासाठी साठवलेली पै-पै घरातील रुग्णांच्या उपचारासाठी घालवली. काहींनी दागिने मोडले, तर काहींनी जमिनी गहाण ठेवून खासगी सावकारांकडून कर्ज काढले. त्यामुळे आता अनेक कुटुंब कोरोना उपचारावरील खर्चाने कर्जबाजारी असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
बारामती तालुक्यातील मेडद, कटफळ, गाडीखेल, गोजुबावी, जळगाव, करावागज अशा अनेक गावांमध्ये पाहणी केली असता, या वेळी अनेक कुटुंबांना कोरोना उपचारावरील खर्चासाठी दागिने मोडणे, जमीन गहाण ठेवून कर्ज घेणे, मुलीचे लग्नकार्यासाठी जमवलेले पैसे खर्च करून रुग्णांचे उपचार केले आहेत. उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने अनेक कुटुंब कर्जबाजारी होऊन रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे वास्तव ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
कोरोना संकटात सर्वसामान्य नागरिकांना पैशाची जुळवाजुळव करताना खूप फरफट झाली. काही रुग्णांचा पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मृत्यूदेखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नोकरदार वर्ग व विमा असलेल्या रुग्णांना मात्र अशा प्रकारच्या त्रास सहन करावा लागला नाही. परंतु अशी कोणतीही तरतूद नसलेल्या कुटुंबाचे मात्र मोठे हाल झाले. कोरोना रुग्णांच्या उपचारावर प्रचंड खर्च झाल्याने आता कुटुंबाकडे कर्जाचा डोंगर उभे राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक हाल झाले ते मात्र कोरोनाग्रस्त शेतकरी कुटुंबाचे. आता खरीप हंगाम सुरू असतानाही आपत्ती आल्याने त्यांच्याकडील तुटपुंजा असणारे सर्व रक्कम संपली आहे. परिणामी त्यामुळे काही शेतकरी कुटुंबांनी आपल्या जमिनी खासगी सावकार, पतसंस्था यांच्याकडे गहाण ठेवल्याचे समजते.
————————————————