गुढी पाडव्यामुळे झेंडू, बिजली, गुलछडीचा भाव वधारला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:21 PM2019-04-05T12:21:22+5:302019-04-05T12:51:41+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर फुलांची मागणी वाढल्याने फुलबाजार बहरला आहे.
पुणे : गेल्या दीड दोन महिन्यांपासून थंड असलेला गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजार गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर फुलांची मागणी वाढल्याने बाजार बहरला आहे. जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून विविध प्रकारची फुले बाजारात दाखल होत आहे. मागणीही मोठी असल्याने कट फ्लॉवर वगळता सर्व फुलांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुपटीने वधारले आहे.
पाडव्याच्या पूजेसाठी झेंडू, बिजली, गुलछडी आदी फुलांना मागणी असल्याचे सांगून व्यापारी सागर भोसले म्हणाले, झेंडूमध्ये गावरान लाल व अष्टगंधाला सर्वाधिक मागणी आहे. वातावरणातील बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलछडीची निम्म्याहून कमी आवक होत आहे. सणामुळे मागणी वाढल्याने त्याच्या भावातही वाढ झाली आहे. सणावेळी केसांमध्ये माळण्यासाठी महिलावर्गाकडून गजऱ्याला पसंती मिळते. त्यासाठी लागणाऱ्या मोगरा व कागड्याचे भावही वीस ते तीस टक्क्यांनी वधारले आहे.
---
उन्हामुळे मालाचा दर्जा घसरलाय
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल शेतात राखून ठेवला होता. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त दिवस राखून ठेवल्यामुळे व उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे फुलांचा दर्जा घसरला आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये जवळपासून ३० टक्क्यांहून अधिक मालाचा दर्जा घसरला आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने फुलांना चांगला भाव मिळत आहे.
- अरूण वीर, अध्यक्ष, अखिल फुलबाजार अडते असोसिएशन
---
फुले प्रतिकिलोचे भाव
झेंडू २०-५०
मोगरा ३००-४००
कागडा १५०-२००
बिजली ३०-८०