गणपती खरंच गेले का गावाला ?... पुण्यात बाप्पाच्या शेकडो मूर्ती नदीकिनारीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 05:45 PM2019-09-09T17:45:47+5:302019-09-09T17:47:24+5:30
नदीत विसर्जित केलेल्या अनेक मुर्ती या नदीपात्राबाहेर आल्याचे दिसून आले.
पुणे : पाच दिवसाच्या गणपतीचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी बाप्पाला निराेप दिला. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये जाेरदार पाऊस हाेत असल्याने मुठा नदी पात्रात खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे. शनिवारी देखील माेठ्याप्रमाणावर पाणी मुठा नदी पात्रात साेडण्यात आल्याने नदी पात्र साेडून वाहत हाेती. अशातच पात्राच्या बाहेर गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले. आज नदीचे पाणी ओसरल्यानंतर अनेक मुर्ती या नदी किनारी आढळून आल्या. पालिकेच्यावतीने तातडीने माेहीम हाती घेत या मुर्ती नदी किनाऱ्यावरुन उचलण्यात आल्या. परंतु या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा हाैदात गणेश मुर्ती विसर्जित करण्याचे महत्त्व अधाेरेखित झाले आहे.
नदीपात्रात गणेश मुर्तीचे विसर्जन केल्याने नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेते. त्यामुळे पालिकेने बांधलेल्या हाैदांमध्ये मुर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन अनेक पर्यावरणप्रेमी संस्थांकडून करण्यात येते. 2014 साली पुण्यातील मानाच्या पाचही गणपती मंडळांनी नदी पात्रात विसर्जन न करता हाैदात मुर्ती विसर्जन करण्याच निर्णय घेतला हाेता. त्याचे पुणेकरांकडून स्वागत करण्यात आले हाेते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती या पाण्यात विरघळत नाहीत. त्याचबराेबर मुर्तीला देण्यात आलेल्या रासायनिक रंगांमुळे पाण्याचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असते. याबाबत अनेक माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसला असला तरी अजूनही अनेक नागरिक नदीतच मुर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य देतात.
शनिवारी नदीच्या पाण्यात विसर्जित करण्यात आलेल्या बहुतांश मुर्ती या पाणी कमी झाल्याने नदीच्या किनाऱ्याला आल्याचे दिसून आले. शहरातील अनेक घाटांच्या नदीकिनारी माेठ्याप्रमाणावर मुर्ती जमा झाल्या हाेत्या. पालिकेकडून या मुर्ती उचलण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. परंतु या प्रकारे मुर्तीची विटंबना हाेण्यापेक्षा त्या हाैदात विसरर्जित करणे याेग्य असल्याचे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले. यामुळे नदीचे प्रदुषण कमी हाेण्यास देखील मदत हाेणार आहे.
पर्यावरण कार्यकर्त्या तसेच जीवित नदी या संस्थेच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे म्हणाल्या, निसर्गाच्या दृष्टीने कुठल्याही मानवनिर्मित गाेष्टीचे नदीत विसर्जन करणे याेग्य नाही. पीओपीच्या गणेश मुर्तीवर अनेक रासायनिक रंग असतात. पीओपी पाण्यात विरघळत नाही, तसेच मुर्तीवरील रंगामुळे प्रदूषणात वाढ हाेते. त्यामुळे मुर्तीच्या पुर्नवापरावरच आमच्या संस्थेचा भर असताे. नदीचे पाणी मुर्तीवर शिंपडून मुर्तीचे हाैदात विसर्जन करण्यास हरकत नाही. आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला असून त्याद्वारे हाैदात मुर्तीचे विसर्जन करणाऱ्या तसेच मुर्ती दान करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाला आम्ही त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कार्याची दाद म्हणून सर्टिफिकेट देत आहाेत. तसेच या मुलांना एक राेपटे सुद्धा देताे. याचा सकारात्मक परिणाम हाेताना दिसत आहे. लहान मुले आपल्या पाल्यांना ओढून हाैदाकडे घेऊन येतात. त्याच पद्धतीने आम्ही मुर्ती दान करण्याचे किंवा मुर्तीचा पुनर्वापर करण्याचे आवाहन देखील नागरिकांना करत असताे.