अनेक ‘हरिभाऊ गायकवाडां’ची गाडी बंदच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:08+5:302021-04-04T04:11:08+5:30
पुणे : छायाचित्रात दिसणारी हरिभाऊ गायकवाडांची गाडी आता पीएमपी सुरू होईपर्य़त बंदच राहणार आहे. कारण बिबवेवाडीतून भांडारकर रस्त्यावर येऊन ...
पुणे : छायाचित्रात दिसणारी हरिभाऊ गायकवाडांची गाडी आता पीएमपी सुरू होईपर्य़त बंदच राहणार आहे. कारण बिबवेवाडीतून भांडारकर रस्त्यावर येऊन गाडी चालवणे त्यांना पीएमपी अभावी शक्यच होणार नाही.
अशीच स्थिती धायरी, वडगाववरून पीएमपीने मध्य पुण्यात येऊन घरकाम करणाऱ्या आशाबाई, मीनाताई, छायाबाई व त्यांच्यासारख्या अनेक घरेलू कामगार महिलांची आहे. कुटुंबाला हातभार म्हणून घरकाम करणाऱ्या या महिलांचा आणि अनेक ‘हरिभाऊं’चा हातच पीएमपी बंद झाल्याने मोडला आहे.
हरिभाऊ आणि त्यांची पत्नी रोज भांडारकर रोडवर पीएमपीने येतात. त्यांची ही वडापावची गाडी बरीच जुनी आहे. त्यावरच त्यांचे घर चालते. उतारवयातही ते त्यामुळे स्वाभिमानाने जगतात. पण अंशत: टाळेबंदीमुळे त्यांची ही कष्टाची कमाईच बंद झाली आहे. पीएमपी का बंद केली याचे कारणच अनेकांना समजलेले नाही. पहिल्या लॉकडाऊन मध्येच पीएमपीचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर ती अलीकडेच सुरू झाली. कोरोना निर्मूलानासाठी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत थोडीफार सावरत होती, तर आता पुन्हा ती बंद करण्यात आली आहे. “सात दिवसांसाठी तरी का,” असा पीएमपीचा नियमित वापर आवश्यक असणाऱ्या लाखो प्रवाशांचा सवाल आहे.
चौकट
“रिक्षा सर्वांना परवडतेच असे नाही. गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी पीएमपी हे शहरातंर्गत प्रवासासाठी एकमेव साधन आहे. आम्ही सर्व नियम पाळू, पण पीएमपी ५० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू करावी.”
-राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमटी इंटक कामगार संघटना.
चौकट
“सरकारच्या या निर्णयात गरीबच होरपळणार आहे. त्याला कोणीही, कसलीही मदत करत नाही. कष्टाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क हिरावून घेऊन त्याला मदतीवर जगणे का भाग पाडावे?”-
संजय शंके, सदस्य, राष्ट्रीय फेरीवाला समिती