पिंपरी पेंढार कोविड सेंटरला मदतीचे अनेक हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:57+5:302021-05-21T04:11:57+5:30
पिंपरी पेंढार गावच्या शेजारी असणाऱ्या गावांमधील रुग्णदेखील या कोविड सेंटरला दाखल करण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी ...
पिंपरी पेंढार गावच्या शेजारी असणाऱ्या गावांमधील रुग्णदेखील या कोविड सेंटरला दाखल करण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी फाउंडेशनला सगळीकडूनच मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली तर त्यासाठी तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके व युवा कार्यकर्ते अमित बेनके यांनी कोविड सेंटरसाठी दोन ऑक्सिजन मशिन नुकत्याच भेट दिल्या व त्या कार्यान्वयीतही झाल्या. जेव्हा कोविड सेंटर सुरू झाले त्या नंतर पिंपरी गावातील मुंबईत राहणारे भूमिपुत्र उद्योजक अरुण वेठेकर यांनी कै. सीताराम कोंडाजी वेठेकर यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांच्या वतीने अभिजित वेठेकर, वैशाली पवार, दीपाली गावडे आणि वेठेकर कुटुंबाने सामजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांच्याशी संपर्क करून एक लाख एक रुपयांची मदत या कोव्हिड सेंटरला केली आहे. गावातील जाधव कुटुंबातील चार सदस्यांचा कोरोनाने बळी घेतला. या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असतानाही सामाजिक भान ठेवत त्यांनी देखील फाउंडेशनला आर्थिक मदत केली असल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते राघव पोटे यांनी दिली.
पिंपरी पेंढार गावातील ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील सर्वच पतसंस्था व विविध संस्थांनी व नागरिकांनी या उपक्रमास सढळ हाताने कुणी वास्तुरूपात तर कुणी सकाळचा नाश्ता, दूध, पिण्याचे पाणी दिले. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
--
फोटो क्रमांक : २० पिंपरी पेंढार कोविड सेंटर मदत
फोटो- आमदार अतुल बेनके यांनी कोविड सेंटरला ऑक्सिजन मशिन दिल्या.