पुण्यात अनेक ‘ललित पाटील’, पोलिसांनी शोध सुरू ठेवावा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी
By नितीश गोवंडे | Published: February 22, 2024 05:13 PM2024-02-22T17:13:36+5:302024-02-22T17:14:12+5:30
पोलिसांनी ही कारवाई अशीच चालू ठेवून पुण्यातील अमली पदार्थांचे रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली....
पुणे : पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण घडल्यानंतर मी तत्कालीन पोलिसांना पुण्यात अनेक ‘ललित पाटील’ आहेत. त्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होत असल्याने अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या प्रत्येक ‘ललित पाटील’चा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, असे सांगितले होते. अखेर कारवाई झाली याचे समाधान आहे. पोलिसांनी ही कारवाई अशीच चालू ठेवून पुण्यातील अमली पदार्थांचे रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
विश्रांतवाडी येथील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत छापा टाकत कोट्यावधी रुपयांच्या एमडी चा साठा जप्त केला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या धाडसी कारवाईबद्दल आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस विभागाचे आभार मानले व कारवाईबद्दल अभिनंदन केले.
सरकारने संजीव ठाकूर याला अटक करण्याची परवानगी द्यावी...
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी माझी सुरूवातीपासून मागणी आहे. पण वरवरचा तपास केला जात आहे. त्यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर सह महत्त्वाच्या दोषी अधिकाऱ्यांना अद्याप अटक झाली नाही. यांची साधी चौकशीही अद्याप झाली नाही. मग डॉ. संजीव ठाकूरला दोषी तरी का ठरवले? चौकशी समितीचा अहवाल जाहीर तरी कशासाठी केला? असा प्रश्न धंगेकर यांनी सरकारला विचारला. डॉ. ठाकूर यांना अटक करण्याची पोलिसांनी परवानगी मागितली असून सरकारने ती त्वरित द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरण हे राज्याच्या गृह खात्याचे अपयश...
पुण्याचा आसपास चार हजार कोटींचे ड्रग्स सापडणे म्हणजे पोलिसांचे, गुप्तचर यंत्रणांचे आणि गृह खात्याचे अपयशच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात साठा निर्माण झालाच कसा? तो एका रात्रीत तर निर्माण झाला नाही? एका दिवसात अमली पदार्थाचे कारखाने इथे उभे राहिले नाहीत? गुप्तचर यंत्रणांना याची माहिती आधीच का समजली नाही, असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरूवारी (ता. २२) उपस्थित केले. या प्रकरणात ठराविक पोलिसांची हप्तेखोरी सुरू होती, असा संशय येतो, असेही ते म्हणाले.
मी गेले वर्षभर ओरडून सांगत आहे, पोलिसांना भेटून, त्यांना पत्र देऊन सांगत आहे की पुण्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट आहे. पोलिसांची आता होत असलेली कारवाई म्हणजे माझा वर्षभरापासूनचा संशय खरा ठरला. पण, पोलिसांनी त्याचवेळी कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
धंगेकर म्हणाले...
- पुण्यात अनेक ‘ललित पाटील’ आहेत. या सर्वांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना जेरबंद करावे
- पुण्यात हुक्का पार्लर, पब संस्कृतीमुळे ड्रग्जचा महापूर वाहतोय, त्यामुळे पुण्यात पब संस्कृती नकोच
- पुण्यात ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे. ते नेस्तनाबूत करा
- पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पुण्यात शिक्षणसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवणे आता पोलिसांच्या हातात आहे.