पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी
By श्रीकिशन काळे | Published: September 21, 2024 04:38 PM2024-09-21T16:38:33+5:302024-09-21T16:38:58+5:30
काही ठिकाणी जुन्या वास्तूचे पुनर्विकास होत असताना, बिल्डरच्या आग्रहास्तव या विहिरी जाणीवपूर्वक बुजवल्या जातात
पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी जुन्या विहिरी आहेत. त्या सर्व चिन्हांकित करुन तिथे फलक लावण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात घडणार नाही. सिटी पोस्टाच्या आवारात शुक्रवारी (दि.२१) झालेल्या घटनेनंतर जागरूक पुणेकर समितीच्या वतीने महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे.
सिटी पोस्टाच्या आवारामध्ये शुक्रवारी महापालिकेचा एक जेटिंग ट्रक अचानक जमिन खचली आणि त्यात पडला. खरंतर त्या ठिकाणी जुनी विहिर होती. त्यावर पेव्हिंग ब्लॉक टाकले होते. परंतु, ट्रकचे ओझे पेलवले गेले नाही आणि ट्रक विहिरीत पडला. त्यामुळे जुन्या विहिरींचा विषय ऐरणीवर आला आहे. अनेकांनी आपल्याजवळील जुन्या विहिरी बुजवून टाकलेल्या आहेत. खरंतर शहरातील विहिरींचा शोध घेऊन त्या ठिकाणी फलक लावायला पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.
ट्रक विहिरीत पडल्यानंतर अनेकांनी तर्कवितर्क लढवले. ती पाण्याची टाकी आहे, रस्ता खचला आहे, विहिर आहे असे अनेक गोष्टी समोर आल्या. सजग पुणेकर तर म्हणाले, तिथे काय अलीबाबाची गुहा होती आणि त्या गुहेत काय ४० चोर राहत होते...? नक्की काय होते तिथे..? आणि प्रत्येकाची वेगळी उत्तरे यावर येत आहेत. खरंतर सिटी पोस्ट ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू आपण सुरक्षितपणे जपलीच पाहिजे. पण, या वास्तूच्या आवारात जर एखादी जुनी विहीर असेल तर त्या विहिरीची नोंद सरकारी दप्तरी असतेच. जर या विहिरीची नोंद सरकारी दप्तरी असेल तर, या ठिकाणी विहीर आहे, असे चिन्ह फलक का लावलेले नाही ?, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.
जुन्या विहिरी जपा !
संपूर्ण पुणे शहरात आणि शहरातील वाड्यांमध्ये अनेक ठिकाणी विहिरी होत्या. आजही त्या विहिरी आहेत. काही लोकांनी त्या बुजवल्या आहेत. काही लोकांनी त्या जपून ठेवलेल्या आहेत. पण काही ठिकाणी जुन्या वास्तूचे पुनर्विकास होत असताना, बिल्डरच्या आग्रहास्तव या विहिरी जाणीवपूर्वक बुजवल्या जातात. त्यांचे संवर्धन करायला हवे, अशी मागणी जागरूक पुणेकर समितीने केली.