PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:12 PM2023-08-01T15:12:50+5:302023-08-01T19:41:02+5:30
महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत
पुणे: मेट्रो च्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. वेस्ट टू एनर्जी मशिचे उद्घाटन झाले. पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2हजार 658 घरांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात मोदींनी काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तर महाराष्ट्रात आता नवीन सरकार स्थापन झालं आहे. ते विकासासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितलॆ आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून सत्ताबदलाचे राजकारण सुरु आहे. भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघडीची सत्ता आली. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा बंडाचे राजकारण होऊन भाजप आणि शिंदे गट एकत्र आले. आणि नवे सरकार स्थापन केले. आता त्यामध्ये अजित पवारही सामील झाले आहेत. यावरून मोदींनी विरोधकांना टोला लगावला आहे. सत्ता येते आणि जाते, देश मात्र तिथेच राहतो. महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र आलेत, या सर्वांचे लक्ष्य एकच आहे. महाराष्ट्राचा विकास करणे. त्यासाठी आम्ही एकत्र काम करतो. असं ते म्हणाले आहेत.
आज भारत सर्वात गतीने 5 जी सर्व्हिस देणारा देश होत आहे.. या देशातील तरुण सर्वच क्षेत्रात कमाल करत आहेत. महाराष्ट्र एकीकडे विकास करत असताना दुसरीकडे कर्नाटकात काय होत आहे ते आपण पाहतो. ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत.. ही परिस्थिती देशासाठी खुप चिंताजनक आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे. असेही मोदींनी यावेळी सांगितले आहे.