Harshvardhan Patil: जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी समजूतदारपणा दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:01 PM2021-12-23T17:01:54+5:302021-12-23T17:02:07+5:30
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका असेल ती नक्की करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बर्याच माणसांनी समजूतदारपणा दाखवला.
बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका असेल ती नक्की करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बर्याच माणसांनी समजूतदारपणा दाखवला. आप्पासाहेब जगदाळे इंदापूर तालुक्यातून जे सांगतील ते आपण ऐकलं पाहिजे, असा स्पष्ट संदेश ज्यांना कुणाला द्यायचा आहे त्यांना आम्ही दिला आहे, अशा शब्दांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिनविरोध निवडी मागील गुपित उघड केले.
इंदापूर येथे गुरुवारी(दि.23) अप्पासाहेब जगदाळे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इंदापूर तालुक्यातील अ प्रवर्गातून निवड झाल्याबद्दल सर्व सोसायटी प्रतिनिधी व शहर भाजप कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हवेली, मावळ व शिरूर तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील बऱ्याच लोकांनी समजूतदारपणा दाखवत ही निवडणूक बिनविरोध केली. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही सुद्धा वरिष्ठ पातळीवर चर्चा केली होती. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेस केंद्राकडून धोरणात्मक निर्णयांसंदर्भात सहकार्य करता येईल, असेही यावेळी पाटील म्हणाले.
प्रास्ताविक इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी केले. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती वनवे, अँड. कृष्णाजी यादव, विलासबापू वाघमोडे, तानाजी थोरात, बाळासाहेब डोंबाळे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.