अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे; अभिनेत्री विद्या बालन यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 11:00 AM2023-02-09T11:00:04+5:302023-02-09T11:00:26+5:30
अतिशय संघर्षाच्या काळात करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते
पुणे : ‘ना मी प्रशिक्षित अभिनेत्री ना माझा कुणी गॉडफादर. रस्ता मिळत गेला तसे यशही मिळत गेले. पण, माझा अभिनय प्रवास तितकासा काही सुखकर नव्हता. पहिल्यांदा चित्रपटासाठी ऑडिशन देताना 'चक्रम' या मल्याळम् सिनेमासाठी माझी निवड झाली. त्यामध्ये मोहनलाल यांच्यासोबत मी काम करणार होते. पण काही कारणाने तो चित्रपट रद्द झाला. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात तब्बल बारा मल्याळम् चित्रपट केले. त्यातले तर तीन प्रसिद्धच झाले नाहीत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत माझ्यावर ‘पनौती’चा शिक्का बसला. अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते, अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी बोलून दाखविली.
चित्रपटांमध्ये एरवी ‘बोल्ड’ भूमिका करणारी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मात्र काळ्या रंगाची कॉटनची साडी, ना दागिने, ना मेकअप अशा साध्या वेशभूषेत आली होती. पण विचारांच्या ‘बोल्डनेस’ने तिने सर्वांचीच मने जिंकली. आपल्या अभिनयाचा प्रवास तिने मनमोकळेपणाने मांडला. त्या पुढे म्हणाल्या, एका चित्रपटामध्ये भूमिका करताना मला काढून टाकतील अशी भीती वाटली होती. तेव्हा आईने मला एका ज्योतिषाकडे नेले. माझा हात पाहिल्यानंतर ज्योतिषी म्हणाले की ‘कोण म्हटलं, तुला काढून टाकतील आणि दुसऱ्याच दिवशी मला काढून टाकल्याचा फोन आला. त्यानंतर मी ज्योतिषांना जवळपास पिटाळूनच लावते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी नैराश्यामुळे रात्रीच्या वेळी चेंबूरच्या साईबाबा मंदिरातही जायचे आणि तेथे बाबांशी जोरजोरात बोलून मन मोकळे करायचे. तेव्हा रात्रीच्या वेळी इथे एक मुलगी येते आणि जोरजोरात बोलते असे पसरले होते हे देखील त्या हसून सांगत होत्या. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडीओने चित्र बदलले. त्यानंतर परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मला मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या.
महिलाकेंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात. अशा वेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे हाच त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिलाकेंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. जे माझ्यासाठी आजच्या काळात एक आव्हान असल्याचे त्या म्हणाल्या. ‘मी स्वत: कल्पना करू शकणार नाही. अशा भूमिका मला मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मी कायम अशा भूमिकांची भुकेलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
ते आमचे काम नाही
राजकीय परिस्थितीवर कलाकारांनी का बोलावे? ते आमचे काम नाही. एखाद्या राजकीय परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती का बोलत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? कलाकारांचे काम हे मनोरंजन करण्याचे आहे. राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे, असे परखड मत विद्या बालन यांनी व्यक्त केले.
काय गं कशी आहेस?
विद्या बालन थिएटरमध्ये जात असताना मध्येच त्यांची चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशी ओळख असलेल्या अरुणा राजे दिसल्या. अरुणा यांना पाहताच विद्या बालन म्हणाल्या, काय गं कशी आहेस? त्यांचे शुद्ध मराठी ऐकून सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.