सह्याद्रीमधील अनेक जांभळांच्या प्रजाती होताहेत नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:58+5:302021-07-19T04:07:58+5:30
पुणे - पश्चिम घाटात जैवविविधता भरपूर आहे. पण तेथील अनेक वनस्पतींची संख्या कमी होत आहे. त्यामध्ये जांभूळ या वृक्षाच्या ...
पुणे - पश्चिम घाटात जैवविविधता भरपूर आहे. पण तेथील अनेक वनस्पतींची संख्या कमी होत आहे. त्यामध्ये जांभूळ या वृक्षाच्या अनेक प्रजाती आहेत. येथे सर्वेक्षणात २१ प्रजाती आढळल्या, तर अनेक नष्ट झाल्याचे समोर आले आहे. याची प्रामुख्याने दोन कारणे असून, एक पावसाचे कमी हाेत जाणारे प्रमाण आणि भाऊबंदकीच्या वादातून तोडली जाणारी वृक्ष. त्याशिवाय शेतीमध्ये अडचण होत असल्याने त्यांच्यावर कुऱ्हाड चालवली जात आहे, अशी माहिती पर्यावरण शिक्षण केंद्रातील अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी दिली.
पर्यावरण शिक्षण केंद्रातर्फेे सह्याद्रीमधील या झाडांचे काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे. सध्या वृक्षलागवड चळवळ सुरू असून, त्यामध्ये नागरिकांनी सह्याद्रीमध्ये जांभळाच्या विविध प्रजाती लावल्या तर त्या पुन्हा फुलू शकतील.
सह्याद्रीतील जैवविविधता अनेक अंगांनी मानवी जीवनाशी जोडली गेली आहे. त्यात शेती, अन्न आणि नैसर्गिक साधनांपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू आणि पदार्थांचा समावेश होतो. सह्याद्री जागतिक पातळीवर जैवविविधतेसाठी संवेदनशील असूनही अनेक जीव, वनस्पती वैविध्याचा अभ्यास झालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे संशोधकांनी केलेल्या संशोधन प्रक्रियेत सामान्यांचा सहभाग नसतो. तो वाढणे आवश्यक आहे. त्यातूनच निसर्गसंपदा जपली जाईल, अशी अपेक्षा बसवंत यांनी व्यक्त केली.
——————————-
जांभळाच्या २१ प्रजातींची नोंद
जांभूळ हंगामात सह्याद्री पट्ट्यातील सुमारे ५० गावांतील शाळांच्या आणि गावकऱ्यांच्या जातींची नोंद केली होती. याचबरोबरीने काही जांभूळ, फणस, करवंदाच्याही वैशिष्ट्यपूर्ण जाती पुढे आल्या. या उपक्रमात फणसाच्या १९ जाती, जांभळाच्या २१ आणि करवंदाच्या २५ जातींची नोंद करण्यात आली होती. जांभळाच्या एकूण २१ ठिकाणच्या ज्या नोंदी घेण्यात आल्या. त्यामध्ये गरपी, मुटकी, रेडी, खाटी, बहाडोली, कुत्री, किरकस, लेंडी, खडकी, द्राक्षी आणि काळा अशा प्रकारच्या जाती आढळल्या.
——————————-
हा अभ्यास करत असताना गोळा केलेल्या जांभूळ वाणांची रोपे बनवून स्थानिक पातळीवर वृक्षारोपणाचा उपक्रमही शाळेतील मुलांनी केला. हा अभ्यास करत असताना गोळा केलेल्या जांभूळ वाणांची रोपे बनवून स्थानिक पातळीवर वृक्षारोपणाचा उपक्रमही शाळेतील मुलांनी केला होता. तो आता बंद आहे. पण पुन्हा सुरू केल्यास जांभळांच्या प्रजाती तग धरू शकतील.
- बसवंत विठाबाई बाबाराव, पर्यावरण शिक्षण केंद्र
———————————-
जांभळाचे गुणवैशिष्ट्य
जांभूळ हे पाचक असून,याच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्याने अतिसाराला प्रतिबंध होतो. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील याच्या काढ्याने थांबते.जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणार्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते. यामुळे दात घट्ट होतात, असे अनेक फायदे या वृक्षाचे आहेत.