अनेकांचा विश्वास बसणार नाही! शिवाजी आखाड्याच्या जागी उभारलंय ‘बालगंधर्व’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 02:53 PM2023-05-22T14:53:58+5:302023-05-22T14:54:36+5:30
कुस्तीपटू म्हणतात, काही लाेकांच्या दबावामुळे आणि राजकारणामुळे शिवाजी आखाड्याची जागा बालगंधर्वला
उमेश जाधव
पुणे : सांस्कृतिक पुण्याचा उल्लेख करताना ‘बालगंधर्व’ हे नाव आपसूकच प्रत्येकाच्या ओठांवर येते. मात्र, याच बालगंधर्वची जागा कधीकाळी शिवाजी आखाड्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावर आज अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. मात्र, राजकीय प्रभावामुळे शिवाजी आखाड्याची ही जागा ‘बालगंधर्व’ला देण्यात आली आणि मंगळवार पेठेत हा आखाडा दिमाखात उभा राहिला.
कुस्ती आणि पुणे यांचं अतूट नातं. पुण्यातील कुस्तीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला चौकाचौकांत तालमी आणि तेथे दिवसरात्र मेहनत घेणारे पैलवान असेच चित्र होते. महापालिकेच्या इमारतीमागे नदी पात्रात शिवाजी आखाडा होता. नियमितपणे येथे कुस्त्या होत होत्या. मात्र, दि. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटल्यानंतर हा आखाडा वाहून गेला. त्यामुळे आजच्या ‘बालगंधर्व’ कलादालनाच्या जागी शिवाजी आखाडा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आखाडा वाहून गेल्यानंतर आता कुस्त्या कुठं घ्यायच्या? असा प्रश्न होता. मग १९६२मध्ये आखाडा भरला ‘बालगंधर्व’ला. अनेक कुस्त्या रंगल्या. तसेच, डेक्कन जिमखान्याचे तत्कालीन प्रमुख भाऊसाहेब गोखले यांनीही त्यावेळी उदार हेतूने कुस्त्यांसाठी जिमखान्याचे मैदान उपलब्ध करून दिले. पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष, आमदार नामदेवराव मते यांच्यात आखाड्याबाबत चर्चा झाली होती. सणस यांनी बालगंधर्वची जागा शिवाजी आखाड्याला देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बाबूराव सणस यांची सत्ता गेली. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. भाऊसाहेब शिरोळे १९५७मध्ये महापौर झाले. त्यानंतर शिवाजीराव ढेरे महापौर झाले भाऊसाहेब नगरसेवक होते याच काळात बालगंधर्वचे भूमिपूजन झाले. त्यावेळी पुण्यातील पैलवान, कुस्ती संघांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. मात्र, महापालिकेकडून आखाड्यासाठी जी जागा मिळेल ती घ्यावी, अशी भूमिका नामदेवराव मते यांनी घेतली. त्यावेळी बालगंधर्वजवळ यायला रस्ताही नव्हता. मंगळवार पेठेतून पायपीट करत यावे लागत होते. आज शनिवारवाड्यापासून आपण पुढे जातो तो पूल नव्हता. दरम्यान, १९६२ ते ७२ या कालावधीत ‘बालगंधर्व’, डेक्कन, भांबुर्डे (आताचे शिवाजीनगर) येथे कुस्त्या खेळवण्यात आल्या.
१९७०मध्ये महापौरांनी जुना बाजार येथे शिवाजी आखाड्याचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. दि. १ नोव्हेंबर १९७० रोजी शिवाजी आखाड्याचा कोनशिला समारंभ राज्याचे तत्कालीन क्रीडामंत्री बॅ. शेषराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला. १९७२मध्ये आखाड्याचे काम पूर्ण झाले आणि पुणेकरांना हक्काचा आखाडा मिळाला. दगडू करमरकर आणि लक्ष्मण वडार यांच्यातील उद्घाटनाच्या लढतीने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
''काही लाेकांच्या दबावामुळे आणि राजकारणामुळे शिवाजी आखाड्याची जागा बालगंधर्वला गेली. तत्कालीन आमदार, तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मते यांनी ही जागा शिवाजी आखाड्याला मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. बालगंधर्वची जागा गेल्यानंतरही नामदेवराव निराश झाले नाहीत. मिळेल ती जागा आखाड्यासाठी घ्यावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे मंगळवार पेठेत जागा मिळाली आणि नामदेवराव मते यांच्या निरीक्षणाखालीच सध्याचा शिवाजी आखाडा बांधण्यात आला. - गोविंदराव सोनवणे, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय तालीम संघ''
''बालगंधर्वच्या जागी शिवाजी आखाडा उभारण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता. कुस्ती क्षेत्रातील काही जाणकारांकडून दिली जाणारी माहिती चुकीची आहे. शिवाजी आखाडा महापालिकेच्या इमारतीमागे झालेल्या मेट्रो स्टेशनच्या समोर नदी पात्रात होता. त्याच्याशेजारी महापालिकेचे शिवाजी उद्यान होते. त्या उद्यानात स्वीमिंग पूल होता. त्याचे नाव करपे तलाव होते. पुरात करपे तलाव वाहून गेला होता. बालगंधर्वची जागा मातंग समाजाची वस्ती होती तेथे शिवाजी आखाड्याचा तीळमात्रही संबंध नाही. - श्रीकांत शिरोळे, काँग्रेस नेते''