आयुक्तालयाचा नकाशा व्हायरल
By Admin | Published: August 9, 2016 01:38 AM2016-08-09T01:38:19+5:302016-08-09T01:38:19+5:30
पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा नव्याने प्रस्तावही पाठविण्यात आला आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा नव्याने प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. शासनस्तरावर या प्रस्तावावर अधिकृत घोषणा झाली नसताना, पिंपरी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीच्या सीमारेषा निश्चित करणारा नकाशा मात्र व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र आपणास याबद्दल काही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेत आहे. पावसाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यास दुजोरा दिला जात नसला, तरी व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेल्या नकाशात स्वतंत्र आयुक्तालयाच्या हद्दीच्या सीमारेषा स्पष्ट दाखविण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आणि परिसरासाठी सध्या परिमंडल तीन हा विभाग आहे. परिमंडल तीनच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, वाकड, निगडी या पोलीस ठाण्यांचा समावेश येतो. त्यात आळंदी, चाकण, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड या हद्दीचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. असे या नकाशातून स्पष्ट होत आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र झोन तयार केले जाण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी म्हणाले असा कोणताही नकाशा पुणे शहर पोलीस आयुक्तालय अथवा शासन स्तरावरून प्रसिद्ध केलेला नाही. (प्रतिनिधी)