मराठेंची अटक पोलिसांच्या आततायीपणातून!, शरद पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:35 AM2018-06-27T06:35:59+5:302018-06-27T06:36:01+5:30
गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज
पुणे : गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पुणे पोलिसांनी केलेली अटक चुकीची आहे. यातून पोलिसांचा आततायीपणा दिसून येत आहे. पोलिसांनी कायद्याचा गैरवापर केला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी टीका केली.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज जयंती समारंभासाठी आलेले पवार म्हणाले की, बँकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार केवळ रिझर्व्ह बँकेला आहे.
दरम्यान, मराठे यांच्या जामीन अर्जावरील निर्णयाचा निकाल मंगळवारीही लांबणीवर पडला़ विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई हे वैयक्तिक कारणास्तव न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने बुधवारी निर्णय दिला जाणार आहे. मराठे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बँकेच्या राजेंद्रकुमार गुप्ता, सुशील मुनहोत, नित्यानंद देशपांडे यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई म्हणजे सूड - राज ठाकरे
पीकविमा कर्ज योजनेबाबत चार वर्षांत सरकारने काहीच केले नसल्याचा अहवाल मराठे यांनी दिल्याने मुख्यमंत्री त्यांच्यावर भडकले होते. महाराष्ट्र बँक ही बँक आॅफ बडोदामध्ये विलीन करण्याचा डाव आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.