बारामती, भोर, हवेलीत मराठा बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:49 AM2017-08-07T02:49:32+5:302017-08-08T11:15:11+5:30
मुंबई येथे ९ आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मराठा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व युवतींनी केले. तीन किमीपर्यंतच्या रॅलीमध्ये १ हजारहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : मुंबई येथे ९ आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मराठा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व युवतींनी केले. तीन किमीपर्यंतच्या रॅलीमध्ये १ हजारहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
रविवारी (दि.७) सकाळी ११.३० वाजता बारामती शहरातील रेल्वे मैदानावरून या रॅलीची सुरवात झाली. रेल्वे मैदान, भिगवण चौक, इंदापूर चौक मार्गावरून रॅली कसबा येथे पोहचली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर गुणवडी चौक, गांधी चौक, भिगवण चौक, पेन्सिल चौक या ठिकाणावरून परत रेल्वे मैदानावर पोहोचल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत सुमारे एक हजाराहून अधिक दुचाकी सहभागी झाल्या होत्या. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत दुचाकींचा सहभाग यावेळी दिसून आला.
९ आॅगस्ट रोजी मुंबईत होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी बारामतीतून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले आहे.
दि. ८ आॅगस्ट रोजी बारामतीतून कार्यकर्ते रेल्वे अथवा इतर वाहनांनी मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईमध्ये बारामती तालुक्यातील समाज बांधवांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातून मोर्चासाठी २५ हजार नागरिक येणार आहेत. मुंबईतील मूकमोर्चानंतर शासनाला समाजाच्या मागण्यांचा विचार करावाच लागेल. त्यानंतर होणाºया संपूर्ण परिणामांची जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिला.
आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मूकमोर्चाला जाण्यासाठी हवेली तालुक्यातील बैठक आज दुपारी येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुलाब गायकवाड बोलत होते.
बैठकीचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक माणिकराव गोते यांनी भूषविले. बैठकीपूर्वी जनजागृतीसाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप कुंजीरवाडी गाव बाजार मैदान येथे झाला. त्यानंतर आळंदी म्हातोबा, चोरघे वस्ती, तरडे, वळती, शिंदावणे, उरुळी कांचन, सोरतापवाडी, पेठ, मार्ग वस्ती, नायगाव, कुंजीरवाडी, नायगाव चौक, कुंजीरवाडी चौक, थेऊर फाटा, काकडे मळा- तारमळामार्गे कारखाना रोड-चिंतामणी मंदिरासमोरून, थेऊर फाटा, लोणी काळभोर गाव अबंरनाथ मंदिर, लोणी फाटा, कदम- वाकवस्ती, कवडीपाट टोलनाका ते परत बोरकर वस्ती येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली.
या वेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक माणिकराव गोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश काळभोर, हवेली तालुका अध्यक्ष दादासाहेब भोंडवे, शरद पाबळे, भाऊसाहेब जगताप, सुभाष कुंजीर, सुनील चौधरी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : मोर्चासाठी पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावातून जय्यत तयारी झाली असून सुमारे ५० हजारांवर पुरंदरवासीय यामध्ये सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या अनुषंगाने गेली १० दिवस पुरंदरमध्ये वातावरण ढवळून निघाले असून क्रांती मोर्चाच्या नियोजन समितीने उत्तम नियोजन केले आहे.
गावागावांतून मराठा समाज मुंबईतील वेळेचे नियोजन करून त्याप्रमाणे प्रस्थान ठेवणार आहेत. महिला व युवती यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. सासवड व परिसरातील मराठा बांधव सकाळी बुधवार (दि.९) सकाळी सहा वाजता सासवड नागरपालिके समोरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मार्गस्थ होणार आहेत.
पुरंदरमध्ये मोर्चा प्रचारासाठी ५ प्रचार गाड्या व एक प्रचाररथ तैनात करण्यात आले आहे. ५ हजार झेंडे, लहान-मोठे स्टिकर्स व काही हजारांत टी-शर्ट उपलब्ध करण्यात आले आहेत. तालुक्यातील लहान-मोठ्या २१५हून अधिक गावे - वाड्यावस्त्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत.
या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी येत्या मंगळवारी (८ आॅगस्ट) सकाळी दहा वाजता सासवड शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने आज देण्यात आली. या रॅलीस सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरवात होईल. त्यांनतर संपूर्ण सासवड शहरात जनजागृती करत रॅली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर समारोप होईल.