मराठा समाजाचा बैलगाडी मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:59 AM2018-09-18T01:59:34+5:302018-09-18T01:59:55+5:30
आंदोलनाचा ४०वा दिवस; दिवे गावाने नोंदविला उत्स्फूर्त सहभाग
सासवड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड येथील शिवतीर्थावर बेमुदत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाचा आज ४०वा दिवस होता. या वेळी दिवे पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी आंदोलनस्थळापर्यंत बैलगाड्यांची मिरवणूक काढली.
पुरंदरच्या ग्रामीण भागात मराठा बांधव आजही प्रामुख्याने शेती करतो. मात्र, शेतीमालाला बाजारभाव नाही. शैक्षणिक बाबतीत आघाडीवर असूनदेखील आरक्षण नसल्याने अनेक ठिकाणी नोकरीची हुकलेली संधी; त्यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. दिवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बैलगाडीतून येऊन मराठा शेतकऱ्यांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला.
बैलगाड्यांसह पदयात्रा काढल्याने ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी सुमारे एका तासाहून अधिक वेळ वाहतूककोंडी झाली होती. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या, ‘राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या तसेच एक मराठा-लाख मराठा’ आदी घोषणांनी शिवतीर्थाचा परिसर दणाणून गेला होता. तहसील कार्यालयावरील ९ आॅगस्टच्या मोर्चानंतर सासवडच्या या ठिय्या आंदोलनाचा सोमवारी ४०वा दिवस होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हे ठिय्या आंदोलन येथे सुरू आहे.
आंदोलनस्थळी दिवसभर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन सुरू आहे. उद्या, मंगळवारी (दि. १८) आंदोलनाच्या ४१व्या दिवशी राजुरी गावातील मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले.