खेडमध्ये रविवारी मराठा संवाद यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:45 PM2018-11-14T22:45:57+5:302018-11-14T22:46:43+5:30
मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे समाज जनजागृतीसाठी राज्यात संवाद यात्रा काढणार असून रविवारी
राजगुरुनगर : मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे समाज जनजागृतीसाठी राज्यात संवाद यात्रा काढणार असून रविवारी (दि. १८) खेड तालुक्यात राजगुरुनगर व चाकण येथे आगमन होणार असल्याची माहिती संयोजक शांताराम कुंजीर व मनोहर वाडेकर यांनी दिली.
त्याच्या नियोजनाबाबत राजगुरुनगर येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अंकुश राक्षे, शंकर राक्षे, अॅड. अनिल राक्षे, अॅड. सुभाष करंडे, विशाल तुळवे, वामन बाजारे, सुदाम कराळे, प्रमोद गोतारणे, गौतम डावखर, कैलास मुसळे, सुदाम कराळे, एल. बी. तनपुरे, रमेश हांडे यांच्यासह आंबेगाव, जुन्नर, मावळ व पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेश समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले, की मराठा समाजाच्या प्रमुख २० मागण्यांसाठी राज्यात ५९ मूक मोर्चे काढून शांततामय मार्गाने आंदोलन केले. त्यातील तुरळक मागण्या मान्य झाल्या आहेत, मात्र प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. दोन वेळा महाराष्ट्र बंद पुकारूनदेखील शासन गंभीरपणे दखल घेत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यात १६ ते २४ नोव्हेंबरदरम्यान संवाद यात्रा काढून मराठा बांधवांच्या संघर्षाला दिशा देण्याचे काम करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला मुंबई येथे राज्यस्तरीय धडक मोर्चा जाणार असून मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची राहील, असा इशारा कुंजीर यांनी दिला. मनोहर वाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना ३० जुलै रोजी चाकण आंदोलनाच्या वेळी गुन्हे दाखल केलेल्या मराठा बांधवांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली व रविवारी राजगुरुनगर येथे ३ वाजता व चाकण येथे ४:३० वाजता मार्केट कमिटी आवारात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कैलास मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. वामन बाजारे यांनी आभार मानले.
मराठा समाजाच्या मागण्या...
१. शासनाने सुरू केलेल्या सारथी संस्थेस पुरेसे मनुष्यबळ व निधी द्यावा. २. फक्त ४ जिल्ह्यांत वसतिगृहे सुरू असून उर्वरित ३२ जिल्ह्यांत वसतिगृहे सुरू करून तेथे भोजनव्यवस्था सुविधा दिली जावी. ३. एकूण ६०० कोर्सेस ५० टक्के सवलतीवर सुरू केले असूनदेखील अनेक ठिकाणी संपूर्ण फी आकारली जाते, ही पिळवणूक बंद व्हावी. ४. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील असंख्य त्रुटी दूर करून कर्जवाटप प्रक्रिया सुलभ करावी.