आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:12 IST2018-02-12T13:08:55+5:302018-02-12T13:12:12+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे
पुणे : भारतात अडीचशे वर्षे पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंटमधील अत्यंत मानाच्या असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचरणी साकडे घातले. आमच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो आणि आपली रेजिमेंट उत्तरोत्तर प्रगती करो, अशी प्रार्थना गणरायाचरणी करीत बाप्पाची आरतीदेखील जवानांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषासोबतच भारत माता की जय... च्या घोषणांनी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी रेजिमेंटचे कर्नल अमन मोहन, मेजर रोहन खिस्ती, लेफ्टनंट कर्नल जयकुमार मुदलियार, रक्षित देशपांडे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने आदी उपस्थित होते.
कर्नल अमन मोहन म्हणाले, सैन्यदलातील मानाच्या असलेल्या आमच्या रेजिमेंटमधील प्रत्येक जवानाची प्रगती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशात सुखसमृद्धी नांदावी, याकरिता मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान देशरक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. देशसेवेच्या कार्याकरिता गणपती बाप्पाने आम्हाला बुद्धी आणि शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली.