मराठा क्रांती मोर्चा पुन्हा 'आक्रमक'; १४ व १५ तारखेला आझाद मैदानावर करणार उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 07:52 AM2020-12-12T07:52:56+5:302020-12-12T07:54:21+5:30
Maratha Reservation : मुंबईतील आझाद मैदान येथे १४ व १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ESBC व SEBC मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत.
पुणे - कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान येथे १४ व १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ESBC व SEBC मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या शुक्रवारी (दि १०) झालेल्या झूम मिटिंगमध्ये समन्वयकांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली.
मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न,सारथी संस्था गतिमान करणे ,अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला ,मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित केसेस मागे घेणे,यांसह इतर मागण्या सोडविण्यासाठी विधिमंडळातील आमदारांनी सदरचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. .
25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे तोपर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पुढील आंदोलनाच्या जनजागृतीसाठी व न्यायालयीन लढ्यात देखील सर्वानी सहभागी होऊन व आपापल्या परीने योगदान द्यावे अशी माहिती दिली आहे.
यावेळी मराठी समाजाला मोठ्या प्रमाणात एकत्रित आणत आगामी काळात व्यापक आंदोलनाची भूमिका देखील मांडण्यात आली.
अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसेल तर सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.