बारामतीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; शहरासह पुर्ण तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:21 PM2023-10-26T13:21:06+5:302023-10-26T13:21:50+5:30
राजकीय व्यक्तींना सर्वत्र गावबंदी करण्यासाठी हालचाली सूरु
बारामती : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी बुधवार(दि २५) उपोषण सुरु केले आहे. त्यापाठोपाठ बारामतीत देखील मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाने आता सुरवातीला बारामती शहर,तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ टप्पाने १६ गावांत साखळी उपोषण होणार आहे. बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी(दि २९) पासुन साखळी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये साखळी उपोषण, एक दिवस लाक्षणिक अन्नत्याग आंदोलनाचा समावेश आहे.
पुर्ण शहर आणि तालुका रविवारी (दि २९) तसेच सोमवारी (दि ३०) खांडज, मळद, पाहुणेवाडी, नीरावागज, घाडगेवाडी येथे, मंगळवारी (दि ३१ ) सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, लाटे , शिरश्णे, बजरंगवाडी येथे तर बुधवारी (दि १) माळेगाव, माळेगाव खुर्द, पणदरे, ढाकाळे, सोनकसवाडी या ठिकाणी साखळी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
बारामती शहरांत नवीन प्रशासकीय भावना समोर मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य एक दिवस लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. माळेगांव कारखान्याच्या शनिवारी(दि २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या गळीत हंगाम शुभारंभाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विराेध करण्यात आला आहे. राजकीय व्यक्तींना सर्वत्र गावबंदी करण्यासाठी हालचाली सूरु झाल्या आहेत. एकुणच मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.