मराठा क्रांती मोर्चा : रक्तदान करून केला शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:25 AM2018-08-21T01:25:40+5:302018-08-21T01:25:52+5:30
सासवडला शिवतीर्थावर ६५ जणांनी केले रक्तदान
सासवड : येथील मराठा क्रांती चौक-शिवतीर्थावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून, शनिवारी रक्तदान करून सरकारचा निषेध करून मनोगत मांडले.
आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी रक्त सांडले. मात्र, आज आम्हाला न्यायासाठी रक्त सांडावे लागत आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात हिटलरशाही सुरू आहे. मराठा बांधवांना मराठा आरक्षणाकरिता आत्मबलिदान करावे लागत आहे. सरकारला मराठा समाजाच्या रक्ताची चटक लागली आहे का? हे सरकार रक्तपिपासू बनले आहे का? असा सवाल करून शनिवारी मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला.
‘एक मराठा- लाख मराठा’, ‘कोण म्हणतो देणार नाही- घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं- नाही कोणाच्या बापाचं’ या घोषणांनी सासवडचे शिवतीर्थ दणाणून सोडले. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सासवडला बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक गावातील मराठा बांधव एक दिवस आंदोलनात सहभागी होत आहेत. शनिवारच्या आंदोलनाच्या दहाव्या दिवशी वनपुरी-उदाचीवाडी गावच्या मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला. या वेळी ६५ मराठा रक्तदात्यांनी रक्तदान केले.