हक्कांच्या मागण्यांसाठी मराठा मोर्चा; बैठकीत निर्वाळा
By admin | Published: September 14, 2016 12:59 AM2016-09-14T00:59:48+5:302016-09-14T00:59:48+5:30
छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून
जेजुरी : छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून, गावगाड्यातील अठरापगड जातींना बरोबर घेऊन वाटचाल करणारा मराठा समाज सध्याच्या काळात मागे पडला आहे, अशी विविध मते मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडत आता अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.
येत्या २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जेजुरी येथील छत्रीमंदिर येथे सोमवारी (दि. १२) शहर पंचक्रोशी व ग्रामीण भागातील मराठा समाजबांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा समाजातील वकील, इंजिनिअर, उद्योजक, व्यापारी व्यावसायिक, प्राध्यापक, शेतकरी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषत: युवकवर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोपर्डी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. मराठा समाजाचा लढा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून न्याय्य आणि हक्कांच्या मागणीसाठी आणि संघटित होण्यासाठी आहे. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या १०० पैकी ९० केसेस खोट्या आहेत, असे मत बैठकीत व्यक्त झाले.
सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांना कर्जमाफी मिळावी, अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील युवकांना आरक्षण नसल्याने तो बेरोजगार होत आहे. आरक्षण मिळण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. समाजाला सध्या कोणी वाली नाही. सत्तेत आपले लोक असूनही काही घटक आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल राहिल्याची खंत आहे अशी विविध मते व मागण्या उपस्थितांनी मांडल्या. २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मूक मोर्चात सहभागी होण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना या वेळी करण्यात आल्या. कोपर्डी घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पोलीस ठाण्यात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)