मराठा मोर्चा आंदोलन चाकणला चिघळले, अग्निशामक दल, एसटी बस व पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:44 PM2018-07-30T13:44:51+5:302018-07-30T22:24:41+5:30

राजगुरूनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा व रास्ता रोका शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली.

Maratha Morcha protested ST bus burned at Chakan | मराठा मोर्चा आंदोलन चाकणला चिघळले, अग्निशामक दल, एसटी बस व पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

मराठा मोर्चा आंदोलन चाकणला चिघळले, अग्निशामक दल, एसटी बस व पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

Next
ठळक मुद्देआंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने खेड तालुका बंददंगलसदृष्य परिस्थिती : १६ वाहने पेटविली, जमावबंदीचे आदेश; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार दोन पोलिसांसह एक जखमी, दिवसभर महामार्गावरील वाहतूक ठप्प

चाकण : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या खेड बंद आंदोलनाला चाकण येथे हिंसक वळण लागले. महामार्गावरील एसटी बस व खासगी मोटारी अशी १६ वाहने पेटविण्यात आली. शंभरावर वाहनांची तोडफोड करण्यात आली. आग विझविण्यासाठी आलेला एक अग्निशामक बंबही पेटविण्यात आला. या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक करून दोन पोलीस व्हॅन पेटवून दिल्या. यात दोन पोलिसांसह एक नागरिक जखमी झाला आहे. त्यामुळे दिवसभर चाकण परिसरात तणाव होता. सायंकाळी जमाबंदी आदेश लागू केल्यानंतर परिस्थिती अटोक्यात येऊन वाहतूक सुरळीत झाली. 
सकल मराठा समाजाच्या वतीने खेड बंद तसेच रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी राजगुरुनगर व चाकण येथे महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत रास्ता रोको करण्यात आला. चाकण येथे सकाळी ११ वाजता मराठा मोर्चाच्या स्थानिक आंदोलकांनी मार्केट यार्ड चाकण येथून पायी रॅली काढून हायस्कूल शाळेतील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही रॅली घोषणा देत महात्मा फुके चौक, नगरपरिषद मार्गे मुख्य रस्त्याने माणिक चौकातून पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात आली. हे आंदोलन अतिशय शांततेत पार पडले. तळेगाव चौकात हजारो आंदोलक महामार्गावर दुचाक्या लावून वाहने अडवून बसले होते. 
दुपारी एक वाजता मराठा मोर्चाच्या आयोजकांनी हे आंदोलन संपल्याचे जाहीर करून सर्वांना घरी जाण्यास सांगितले व ते निघून गेले. मात्र, काही आंदोलक गाड्यांची तोडफोड करीत होते. त्यानंतर या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक चालू केली. सर्वप्रथम वाघेवस्तीजवळ पाच एसटी  बस जाळल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. मग या तरुणांनी महामार्गावरील आळंदी फाटा ते एकतानगरपर्यंत अनेक बस पेटवल्या. तळेगाव चौकात तळेगाव नगर परिषदेचा १२ हजार लिटर पाणी भरलेला तळेगाव नगर परिषदेचा एक अग्निशामक बंब पेटविला. त्यापाठोपाठ महामार्गावर असणाºया ३ दुचाकी, १२ त १५ एसटी बस, खासगी वाहने, तळेगाव चौकातील वाहतूक नियंत्रण करण्याची पोलीस चौकी, पोलिसांच्या दोन व्हॅन जाळल्या. त्यानंतर एसटी बस स्थानकावरील एक एसटी बस व महाराष्ट्र शासनाची एक सुमो जाळली. या वेळी बस स्थानकात तीन शिवशाही बस उभ्या होत्या. या बसवर शिवशाही असल्याने त्या बाहेर काढून दिल्या. बस स्थानकाच्या कार्यालयाला आग लावली.  जाळपोळीचे फोटो व व्हिडीओ चित्रण करणाºयांचे जवळपास १०० पेक्षा जास्त मोबाईल रस्त्यावर आपटून फोडले. इमारतींवरून फोटो काढणाºया तरुणांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यानंतर या तरुणांनी आपला मोर्चा चाकण पोलीस ठाण्याकडे वळविला. पोलीस ठाण्यावर दगडफेक करून पोलीस ठाण्यासमोरील दोन मोटारींवर दगड टाकून दोन मोटारी पेटवून दिल्या आणि पुरावा नष्ट व्हावा म्हणून या तरुणांनी ज्या-ज्या ठिकाणी सीसी टीव्ही आहेत ते कॅमेरे हातातील दांडक्यांनी व गजांनी फोडून टाकले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनाही तरुण घाबरत नव्हते. 
दुपारी चार वाजता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चाकण पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर साडेचारच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आंदोलकांना तळेगाव चौकात शांततेचे आवाहन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जमाबंदीचा आदेश लागू केल्यानंतर वातावरण निवळले. 
...........................
तोडफोड आणि जाळण्यात आलेल्या गाड्या यांचे पंचनामे अद्याप करण्यात आले नाही. तणाव परिस्थिती कमी झालेवर पंचनामे पूर्ण करून नक्की किती वाहने नुकसान झाले सांगण्यात येईल असे पोलीस अधिकाºयांनी सांगितले आहे.

........................................

पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज तपासून दोषींवर कडक कारवाई करावी
आमचे आंदोलन शांततेत झाले असून मराठा क्रांती मोर्चाच्या कोणत्याही कार्यकत्यार्ची तोडफोड करण्याची भूमिका नव्हती. मात्र या आंदोलनात कोणता तरी विशिष्ट जमावाने भाग घेऊन हे घडवून आणले आहे. मराठा समाज आंदोलनाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज तपासून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. पोलीस खात्याने समिती स्थापन करून याची चौकशी करावी. आणि कडक कायदशीर कारवाई करावी. या जमावाने अनेक दुकानांचे सीसी टीव्ही फोडले आहेत. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 


 

 

   

Web Title: Maratha Morcha protested ST bus burned at Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.