पुण्यात स्वराज्य संघटना आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने; छगन भुजबळांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:58 AM2023-11-27T11:58:23+5:302023-11-27T11:59:27+5:30
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांना विरोध झालेला पाहता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
पुणे - राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. हिंगोली, जालनातील सभेत भुजबळांनी केलेल्या भाषणानंतर जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यातच आज पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात आज स्वराज्य संघटना आणि ओबीसी समर्थक एकमेकांसमोर आल्याची घटना पाहायला मिळाली. भुजबळांनी मराठा-ओबीसी यांच्यात तेढ निर्माण करू नये असं म्हणत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. तर ओबीसी समर्थकांनीही भुजबळांच्या जयघोष करत एकच पर्व, ओबीसी सर्व या घोषणा दिल्या.
नेमकं काय घडलं?
पुण्याच्या सर्किट हाऊस इथं स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि कार्यकर्त्यांनी भुजबळांना इशारा देत जर मराठा ओबीसी यांच्यातील वाद तुम्ही मिटवला नाही तर यापुढे भुजबळांची गाडी फोडायलाही मागे पुढे पाहणार नाही असं म्हटलं. यावेळी पोलिसांनी तात्काळ दखल घेत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. पण त्यावेळी भुजबळांच्या समर्थनासाठी आलेले ओबीसी कार्यकर्तेही आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांकडूनही या निषेधाचा विरोध केला.
यावेळी ओबीसी कार्यकर्ते म्हणाले की, आज पुण्यातील सर्किट हाऊस इथं ओबीसीचा बुलंद आवाज असलेले छगन भुजबळ उपस्थित आहेत. अशावेळी एखादा विशिष्ट समाजाचा माणूस येऊन भुजबळांना धमकी देतो हे आम्ही सहन करणार नाही. छगन भुजबळ हे ओबीसींना घटनेने दिलेल्या २७ टक्के आरक्षणासाठी लढत आहेत.आम्ही कुणाच्या ताटातले मागत नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्यावे. भुजबळांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही.आमचे हक्काचे आरक्षण आहे ते वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा समाज हा आमचा मोठा बंधू आहे त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही. त्यांना स्वतंत्र्य आरक्षण द्यावे, ओबीसी कोट्यातून देऊ नये अशीच भुजबळांची मागणी आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, आमचे भुजबळांना सांगणे आहे त्यांनी सबुरीनं घ्यावे.जर सबुरीनं घेणार नसाल तर ४ पाऊलं ७० वर्ष मागे घेतली. आजही समोर गाडी असताना माघार घेतली.मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तुम्ही नख लावण्याचे काम करू नका. अन्यथा महाराष्ट्रात तुम्हाला फिरणे अवघड करू. हे मी तुम्हाला आज तुम्ही जिथे बसलाय तिथे येऊन सांगितले हे लक्षात घ्या असा इशारा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. पुण्यात छगन भुजबळ हे विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार होते. त्यासाठी ते शासकीय विश्रामगृहात आहे. परंतु स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांना विरोध झालेला पाहता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते.