खंडूजी बाबा चौकात आंदोलकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:02 PM2018-08-09T21:02:17+5:302018-08-09T21:04:19+5:30
शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडूजी बाबा चौक(डेक्कन) येथे सुमारे दोन तासाहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी बाजूला केले.मात्र यावेळी लाठीचार्ज करण्यात आला नाही.
पुणे : शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडूजी बाबा चौक(डेक्कन) येथे सुमारे दोन तासाहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी बाजूला केले.मात्र यावेळी लाठीचार्ज करण्यात आला नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यासाठी बंद पुकारला आहे.त्याचे पडसाद पुण्यातही बघायला मिळाले.शहरातील महत्वाच्या अनेक रस्त्यांवर दुचाकी रॅल्या काढण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालय आणि चांदणी चौक वगळता शहरात कुठेही बंदला हिंसक वळण लागले नाही.
खंडूजी बाबा चौकाला लागूनच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे.सकाळीदेखील अल्पकाळ या पुतळ्याजवळ रस्ता रोको करण्यात आला होता.चार वाजेनंतर पुन्हा आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून धरला होता. यावेळी काही आंदोलकांनी भाषणही केले.पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही आंदोलक रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते.अखेर पोलिसांनी लाठी उगारताच आंदोलक बाजूला झाले आणि कर्वे रस्ता, लकडी पूल, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला.मात्र त्यानंतरही डेक्कन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.