पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर मराठा आंदोलकांचे रस्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:38 PM2024-02-25T12:38:48+5:302024-02-25T12:39:16+5:30
एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काच नाही कुणाच्या बापच, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे' अशा घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले
नीरा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटीलांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी नीरा येथील सकल मराठा समाज नीरा पंचक्रोशीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 'एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काच नाही कुणाच्या बापच, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे' अशा घोषणा देत रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते.
शनिवार पासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रास्तारोको करण्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले होते. शनिवार एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित केले होते. रविवारी सकाळी नीरा (ता.पुरंदर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर काही काळासाठी ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. याकाळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने नीरा पंचक्रोशीतील पिंपरे (खुर्द), गुळूंचे, कर्नलवाडी, राख, जेऊर, मांडकी आदी गावातील मराठा बांधव उपस्थित होते.
मराठा आंदोलक सुरेश वीर, सचिन मोरे, तुळशीराम जगताप, मंगेश ढमाळ, कुलदीप पवार, अजित सोनवणे, सचिन थोपटे, गणेश थोपटे आदींनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नीरेतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस स्टेशन अंकित नीरा पोलिस दुरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संदिप मोकाशी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांनी दहा मिनिटांनंतर पोलीसांंना आपल्या मागण्यांचे निवेदन पत्र दिले.