Maratha Reservation: सर्वेक्षणावरून मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा
By नितीन चौधरी | Published: December 4, 2023 03:51 PM2023-12-04T15:51:24+5:302023-12-04T15:52:41+5:30
प्रत्येक समाजात मागास आहेत, त्यांचे सर्वेक्षण केव्हा करणार असा सवालही त्यांनी केला आहे...
पुणे : राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला केवळ मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबत आदेश दिल्यानंतर आता यावरून आयोगाच्या सदस्यांमधील खदखद आता उघड होत आहेत. सर्वच समाजांचे सर्वेक्षण करावे, या मुद्द्यावरून आता आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला आहे. केवळ एका समाजाच्या अजेंड्यावर आयोग काम करू शकत नाही. प्रत्येक समाजात मागास आहेत, त्यांचे सर्वेक्षण केव्हा करणार असा सवालही त्यांनी केला आहे.
गेल्या महिनाभरात आयोगाच्या तिस-या सदस्याने राजीनामा दिला आहे. यापूर्वी प्रा. संजीव सोनवणे, अड. बालाजी सगर किल्लारीकर आणि आता त्यात लक्ष्ण हाके यांची भर पडली आहे. राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला दिलेल्या टर्म ऑफ रेफरन्सनुसार केवळ मराठा समाजाचे मागासलेपण तपासावे असा त्यांच्या सोयीचा अर्थ आयोगाच्या काही सदस्यांनी काढला आहे. मात्र, आयोगाच्या काही सदस्यांनी सर्वच समाजांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण व्हावे, त्यातून वस्तुस्थिती समोर येईल, अशी भुमिका मी मांडली. त्याला विरोध झाल्याने मी व्यतिथ होऊन राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजाचे मागसलेपण तपासताना एकाच जातीमध्ये तुलना कशी होऊ शकते, असा सवाल करत हाके यांनी, शैक्षणिक गळती किंवा त्याचे प्रमाण, गरीब राहण्याचे प्रमाण, महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण असे अनेक प्रश्न आहेत. राज्य सरकारच्या पत्रकात स्पष्ट उल्लेख नसल्यानेच हे मतभेद झाले आहेत. त्यामुळे निम्म्या सदस्यांचे मत वेगळे होते. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार अर्थ काढला. या सदस्यांवर अप्रत्यक्ष हस्तक्षेप तसेच राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
हा संवैधानिक आयोग असून आम्ही कुणाच्या अजेंड्यावर काम करत नाही. त्यामुळेच जबाबदारीची जाणीव व सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी मी राजीनामा दिला आहे. मराठा समाजात जसे मागास आहेत, तसेच अन्य समाजातही मागास आहेत. त्यांचे सर्वेक्षण केव्हा करणार, की ज्याने मागणी केली त्याचेच सर्वेक्षण करणार आहेत, असा खडा सवालही त्यांनी केला.
आता उरले केवळ सात सदस्य
आयोगाचे सदस्य असलेले बबन तायवाडे यांनी २ वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर महिन्यापूर्वी अंबादास मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एका महिन्यात आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. तीन जागा रिक्त आहेत. आता अध्यक्षांसह सात सदस्य उरले आहेत.