मराठा आरक्षण रद्द झाले... यात आमची चूक काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:34+5:302021-05-07T04:10:34+5:30
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या ...
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निवड प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. परीक्षा पास होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेची गेल्या दीड वर्षापासून वाट पाहतोय, यात आमची चूक ती काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कोणत्याही उमेदवाराचे नुकसान न करता तत्काळ सरसकट नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी यशस्वी उमेदवारांनी केली आहे.
एमपीएससीने २०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. यापैकी ४१३ उमेदवारांची अंतिम निवड केली. यामध्ये एसईबीसी आरक्षणानुसार ४८ जागा राखीव ठेवल्या. जुलै २०१९ मुख्य परीक्षा घेऊन जून २०२० मुलाखती घेऊन अंतिम निकाल लावला. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निकाल लागूनही नियुक्ती देण्यास राज्य सरकाने टाळाटाळ केली. मुख्यमंत्रांच्या बैठकीत नियुक्त्या दिल्या, तर मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियुक्ती अंतिम निकाल लागल्यावर दिला जाईल. असे सांगण्यात आले होते. आता न्यायालयाचा निकालही लागला आहे. त्यामुळे सरकारने अधिकचा वेळ न घेता तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. एसईबीसी आरक्षणानुसार ४८ उमेदवारांचे देखील नुकसान न करता त्यांनाही शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन नियुक्तीत द्यावी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
कोट
आमच्या भविष्याशी खेळ करू नये
राज्य सरकारने नियुक्त्या दिल्या नाहीत, यामध्ये उमेदवारांची काहीच चूक नाही. नियुक्ती हा शब्द एका कागदपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील उमेदवारांचे कष्ट पाहावेत. सर्वच उमेदवारांनी समान कष्ट घेतलेले आहेत. यामध्ये केवळ सरकारचीच चूक आहे. आमच्या भविष्याशी खेळ न करता प्रामाणिकपणे आणि कष्टाने मिळविलेल्या पदावर तत्काळ नियुक्तीत द्यावी, अशी मागणी एका महिला उमेदवारांनी केली.
एसईबीसीच्या जागा खुल्या गटात रूपांतरित करून निकाल तोच ठेवा
एसईबीसी लाभ घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसणार नाही. केवळ एसईबीसी हा शब्द रद्द होऊन खुला गट असे करावे. एसईबीसीच्या जागा खुल्या गटामध्ये रूपांतरित करून निकाल आहे तसेच ठेवावेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही, असे एका उमेदवाराचे म्हणणे आहे.
भावी अधिकारी शेतावर गडी म्हणून राबतात
परीक्षा पास होऊन देखील केवळ नियुक्ती नाही म्हणून आर्थिक गरज भागविण्यासाठी भावी अधिकारी शेतात गडी म्हणून राबत आहे. तर कोणी फळविक्री करीत आहे. तर कोणी खासगी क्लास घेत आहे. तर कोरोनामुळे काम गेल्याने बेरोजगार म्हणून नियुक्तीची वाट पाहतोय.
या परीक्षांवर होऊ शकतो परिणाम
- स्थापत्य अभियांत्रिकी २०१९ , ११६१ पदे (मुलाखती रखडल्या).
- स्थापत्य अभियांत्रिकी २०२०, पूर्व परीक्षा झाली.
- पोलीस उपनिरीक्षक ४६९ पदे (नियुक्त्या रखडल्या).
- पोलीस उपनिरीक्षक २०१९ मुख्य परीक्षा झाली, मैदानी चाचणी प्रतीक्षेत.
- पशुधन विकास अधिकारी ४३५ पदे (नियुक्त्या रखडल्या).
-तालुका न्याय दंडाधिकारी चाळणी परीक्षा झाली.