Maratha Reservation : मोठी 'राजकीय' घडामोड! खासदार संभाजीराजे अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:49 PM2021-05-29T16:49:17+5:302021-05-29T16:59:26+5:30
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे.
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे हे शनिवारी ( दि. २९ ) वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
खासदार संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्हीही नेते या पत्रकार परिषदेत आपापली भूमिका या मांडणार आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला शुक्रवारी तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. हे तीन पर्याय आणि पाच मागण्यांवर येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी. अन्यथा, शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देवू. कोरोना वगैरे काही पाहणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही ते भेट घेणार आहेत.असे आहेत पाच पर्याय
१) नोकरभरती - सर्वोच्च न्यायालयानेच आपल्या निकालात ९ सप्टेंबर २०२० पूर्वीच्या नियुक्त्या कायम केल्या आहेत. जवळपास २१८५ उमेदवार आहेत. तरीही जस्टीस भोसले अहवालाचे कारण पुढे करत या उमेदवारांना शासकीय सेवेत घेतले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाल दिल्यावरही या उमेदवारांच्या आयष्याशी का खेळताय, असा प्रश्न करतानाच तातडीने या उमदेवारांना सेवेत सामावून घेण्याची मागणी संभाजी राजे यांनी केली.
२) सारथी - छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेली सारथी संस्था नीट चालविल्यास आरक्षणापेक्षा अधिक चांगला लाभ यातून मिळेल. पण, आज त्याची दुरावस्था झाली आहे. या संस्थेला स्वायत्तता द्यावी. समाजासाठी तळागाळात काम करणाऱ्या चांगल्या लोकांना संस्थेवर घ्यावे. सध्या ज्यांचा संबंध नाही असे नऊ सनदी अधिकारी तिथे नेमले आहेत. तसेच, किमान एक हजार कोटींच्या निधीची घोषणा करावी.
३) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम करावे.
४) प्रत्येक जिल्ह्यात समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे. अनेक जिल्ह्यात केवळ घोषणा झाली पण पुढे काही नाही. यावर तातडीने काम व्हायला हवे.
५) ओबीसींप्रमाणे मराठा समाजातील गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत मिळायला हवी.