Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात, आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:21 PM2018-08-03T12:21:46+5:302018-08-03T12:42:08+5:30
Maratha Reservation: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशिधान व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे सुरुवात झाली आहे.
पुणे - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशिधान व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे सुरुवात झाली आहे. शुक्रवार (3 ऑगस्ट) आणि शनिवार (4 ऑगस्ट) दोन दिवस आयोगाची बैठक होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या बैठकीला समितीचे सदस्य सर्जेराव निमसे, दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, भूषण कर्डिले, तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख तसेच आयोगाचे अधिकारी उपस्थित आहेत. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात झाली.
या बैठकीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि पुढील तीन या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे. यावेळी बार्टीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सर्वेक्षणाचे काम पूर्ण
मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यात मराठा समाजातील सामाजिक संस्था, सामूहिक संघटना, ग्रामपंचायत आणि वैयक्तिकरीत्यादेखील निवेदने देण्यात आली. तब्बल 26 हजार अर्ज मागासवर्गीय आयोगाकडे प्राप्त झाले आहेत.
तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आवश्यक असलेली माहिती प्राप्त व्हावी यासाठी सहा विभागांत सहा संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. आयोगातर्फे या संस्थांना आरक्षणासंदर्भातील प्रश्न देण्यात आले होते. आयोगाने दिलेल्या प्रश्नानुसार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.