मराठा आरक्षणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 11:13 PM2018-06-26T23:13:16+5:302018-06-26T23:15:31+5:30
मोर्चे शांततेत निघाले असले तरी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचले असं फडणवीस म्हणाले
पुणे: मराठी आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. मराठा समाजानं राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढले. या मोर्चात कोणत्याही घोषणा दिल्या गेल्या नसल्या तरीही त्यांचा आवाज हजारोपटीनं मोठा होता, असं फडणवीस म्हणाले.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्थेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. 'मराठा समाजानं राज्याच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. या समाजातील मूठभर लोक आज श्रीमंत आहेत. मात्र उर्वरित समाज गरिब असून त्यांच्या विकासासाठी आरक्षण देण्यात यावं, यासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांची सरकारनं दखल घेतली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं.
या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक हे मान्यवर उपस्थित होते.