Maratha Reservation : ...तर मग मी आणि प्रकाश आंबेडकर का नाही एकत्र येऊ शकत ? संभाजीराजेंनी उलगडलं भेटीमागचं 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:03 PM2021-05-29T18:03:12+5:302021-05-29T18:03:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशी इच्छा होती.
पुणे : प्रकाश आंबेडकर यांना खूप दिवसांपासून भेटायचं होते. त्याच्या पाठीमागचे महत्वाचे कारण म्हणजे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील हे आहे. त्याचसह मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हा भेटीचा जुळून आला आहे. आणि जर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात तर मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊ नाही शकत? असा सवाल करत संभाजीराजेंनी उपस्थित करत या भेटीमागचं 'राज'कारण सांगितले.
पुण्यात खासदार संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? तसेच शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशी इच्छा होती.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही : प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा आणण्याची आवश्यकता आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच ताजेपणा येईल असे मत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मराठा आरक्षणासाठी आता दोनच कायदेशीरपर्याय आहेत.त्यातला पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा ही याचिका जर फेटाळली गेली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.
संभाजीराजेंकडून विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी सुरु...
मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे हे शनिवारी ( दि. २९ ) वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते.