मराठा समाजाच्या पक्षाला दिवाळीचा मुहूर्त, रायरेश्वर मंदिरात होणार स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:46 IST2018-09-25T15:44:42+5:302018-09-25T15:46:19+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता राजकीय मैदानात उतरणार आहे.

मराठा समाजाच्या पक्षाला दिवाळीचा मुहूर्त, रायरेश्वर मंदिरात होणार स्थापना
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता राजकीय मैदानात उतरणार आहे. दिवाळीच्या पाडव्याला मराठा समाज नवीन पक्ष काढणार असून या पक्षाची स्थापना रायरेश्वर मंदिरात होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांची फसवणूक करणारा पक्ष आहे, असा आरोप सुरेशदादा पाटील यांनी केला. ते म्हणाले, राज्यात 40 टक्के मराठा समाज आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेवर असताना मराठा समाजाची फसवणूक केली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सुद्धा तेच केले. त्यामुळे मराठा समाज वैफल्यग्रस्त झाला आहे.
मराठा समाजाकडून काढण्यात येणाऱ्या पक्षात कोणीही अध्यक्ष नसणार आहे. या पक्षात शंभर जणांची कोअर कमिटी असणार आहे. या कमिटीत निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, असे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले. तसेच, सध्याच्या स्थितीत जवळपास 20 आजी-माजी आमदार समितीच्या संपर्कात असल्याचा दावा करत एमआयएम आणि भारिप सोबत आल्यास आघाडी करण्यास तयार असल्याचेही यावेळी सुरेशदादा पाटील म्हणाले.