दक्षिणेपेक्षा मराठी अभिनयाची बाजू उत्कृष्ट - महेश मांजरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 04:57 PM2024-11-16T16:57:34+5:302024-11-16T16:59:24+5:30
'इथे रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट' अशी स्पष्ट भूमिका अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.
पुणे : ‘‘दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीविषयी अनेक मिथके पसरली आहेत. ते व्यावसायिक जरूर आहेत, पण मराठीमध्ये आशयाची समृद्धी सर्वाधिक जाणवते. इथे रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट आहे. पण, ३ कोटी रुपयांत चित्रपट हा प्रकार मराठी निर्मात्यांनी बाजूला ठेवला पाहिजे आणि किमान ५० कोटींच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटाचे स्वप्न पाहून ते साकारले पाहिजे. मराठी चित्रपट देशभर प्रदर्शित केला पाहिजे आणि प्रमोशनसाठी मोठे बजेट ठेवले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.
दकनी अदब फाऊंडेशन आयोजित पाचव्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन शनिवारी (दि.१६) ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी राहुल रंजन महिवाल व अस्लम हसन, डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजिका मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शाह, शाहीर सुरेश वैराळकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी व कवी राहुल रंजन महिवाल यांच्या ‘जश्न ए दिवानगी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. उद्घाटनानंतर मांजरेकर यांची मुलाखत झाली.
मांजरेकर म्हणाले, देशातील इतर कुठल्याही चित्रपटसृष्टीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टी अधिक संघटित आणि सुव्यवस्थित आहे. त्यामुळे बदलत्या काळात मराठी चित्रपटांनी तीन कोटींमध्येच अनेक चित्रपट करण्यापेक्षा, मोठ्या बजेटच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटांचे ध्येय ठेवावे.’’
मोनिका सिंग प्रास्ताविकात म्हणाल्या, “डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलने अल्पावधीत साहित्यप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हा साहित्य महोत्सव अधिकाधिक आशयसंपन्न करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लेखक आणि वाचकांमध्ये नाते जोडण्याचा आमचा उद्देश आहे.”
साहित्य मानवी सुख-दुःखाचे, वेदनांचे, सोसण्याचे दर्शन घडवते. धर्म, राजकीय आणि अर्थसत्ता, यामुळे समाजात दुःख निर्माण होतात. अशा मानवी दुःखाचा अन्वयार्थ साहित्य शोधते, त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी वाचनसंस्कृती जोपासली पाहिजे. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून भाषांमधील सेतू जोडण्याचे आणि साहित्यसंवर्धनाचे कार्य होत आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक