‘मराठी आॅलिम्पियाड’ला इंग्रजी शाळांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:03 AM2017-12-05T07:03:13+5:302017-12-05T07:03:26+5:30
एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी मातृभाषेपासून दूर जात आहेत.
नम्रता फडणीस
पुणे : एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी मातृभाषेपासून दूर जात आहेत. हे असेच घडत राहिले तर एक दिवस मराठी भाषा लुप्त होईल की काय अशा नानाविविध शंका उपस्थित केल्या जात असताना ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’च्या अभिनव प्रयोगाने मात्र हा गैरसमज पूर्णत: खोडून काढला असून, मराठी भाषाप्रेमींना एक आशेचा किरण दाखवला आहे.
विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून भाषा संस्थेनेसुरू केलेल्या ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’ स्पर्धेला इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९00 विद्यार्थी या आॅलिम्पियाड’च्या परीक्षेला बसले असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी भाषेमध्ये कसदार लिहिती-वाचती पिढी निर्माण व्हावी यासाठी भाषा संस्थेतर्फे २0१५मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा आॅलिम्पियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली.
पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या होती केवळ ५00. तीन वर्र्षांंमध्ये ही संख्या १९00वर पोहोचली. ही नक्कीच मराठी भाषेसाठी शुभवार्ता म्हणावी लागेल. या अभिनव प्रयोगाविषयी भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.
त्या म्हणाल्या, भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आत्मीयता निर्माण व्हावी हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात भाषेच्या गोडीचे बीज रुजावे या दृष्टीने या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेतून मुलांची भाषिक बुद्धिमत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौथी आणि सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून, ज्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजना आणि कौशल्य या चार घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या भाषिक आकलनाबरोबरच भाषण, संवाद आणि नवनिर्मिती क्षमता या निकषांवर आधारित प्रश्नांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. शब्दांशी खेळत भाषेचे सहजसोप्या पद्धतीने आकलन करून देणे हा या स्पर्धेचा गाभा आहे. या स्पर्धेला पालकांसह, शाळा आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर पाहिल्यानंतर मुलांना मराठीमध्ये साधी वाक्येही व्यवस्थित लिहिता येत नसल्याचे दिसून आले आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच शाळेमधील मराठी अभ्यासक्रमावर आधारित साचेबद्ध परीक्षेचे स्वरूप न ठेवता मुलांना भाषेबरोबर खेळता आले पाहिजे अशी स्पर्धेची बांधणी करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून मुलांचा भाषिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.