'स्वतःला एकटे समजू नका,....'; मराठी कलाकारांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसिकांना 'हटके' संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:00 PM2020-04-11T17:00:49+5:302020-04-11T17:03:06+5:30
'स्वतःला एकटे समजू नका, स्वतःच्या सुरक्षेसाठी घरी राहा'
पुणे : कोरोनाबाबात जनजागृती करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावले असून, वेगवेगळ्या उपक्रमांमधून नागरिकांना संदेश देण्याचे काम केले जात आहे..काही कलाकारांनी लॉकडाउनमुळे मानसिक ताणतणावाखाली असलेल्या लोकांना पोस्टर्स च्या माध्यमातून 'स्वतःला एकटे समजू नका, स्वतःच्या सुरक्षेसाठी घरी राहा' असे आवाहन केले आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे लोकांचे दैनंदिन वेळापत्रक बदलले आहे. याचाच प्रभाव त्यांना मानसिक तणाव जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकरांनी पुढाकार घेऊन लोकांना सकारात्मक विचारांकडे नेण्याचा विडा उचलला आहे.
जर लॉकडाउन असाच पुढे सुरू राहिला तर लोकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण, कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर घरी रहाणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी श्रीनिवास कुलकर्णी आणि अमोल घोडके यांनी हा उपक्रम राबविला आहे. यात सर्व मराठी कलाकारांनी एकत्र येऊन काही पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पोस्टर्स त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत
दीपाली सय्यद, हार्दिक जोशी, मानसी नाईक, देवदत्त नागे, संदीप पाठक, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे, अक्षया देवधर, पुनीत बालन, स्मिता शेवाळे, भार्गवी चिरमुले, किरण गायकवाड, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, सुयश टिळक, संग्राम साळवी आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
या मराठी कलाकरांनी एकत्र येऊन एक संदेश लोकांसाठी तयार केला आहे. त्यात ते सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करत आहोत, त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
----