'शेतकरी आंदोलना'वर मराठी सेलिब्रेटींची ‘चुप्पी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:30+5:302021-02-06T04:19:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : 'शेतकरी आंदोलना'चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : 'शेतकरी आंदोलना'चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा सडाच पडतो आहे. आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर देशात उसळलेली प्रतिक्रियांची लाट तर शमण्याचं नावच घेत नाहीये. पण या सगळ्यात 'फार कमी' मराठी सेलिब्रेटीज् स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. त्यांपैकीच काही जणांशी 'लोकमत'ने बातचीत केली.
"सर्वात आधी या प्रकारात झालेल्या कुठल्याही हिंसेचे समर्थन मी करीत नाही. वारंवार चळवळ अथवा आंदोलन हिंसक वळण घेत असेल त्या आंदोलनाने स्वपरिक्षण करायला हवे. पण त्याच बरोबरीने आपल्याच देशातील जनतेवर जेव्हा येथील सरकारी यंत्रणा, पोलीस हिंसक कारवाया करते तेव्हा ते अधोगतीकडे जाणाऱ्या लोकशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. एका बाजूला आपण कसे सेवक आहोत, असे दाखवणे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसमावेशकता तसेच लवचिकता नसणे असा दांभिकपणा सरकारमध्ये दिसत आहे. हे भांडण राजकीय आहे. त्यामुळे यात दोन किंवा अधिक बाजू असणारच पण विरोध करणाऱ्या कुणालाही दरवेळी देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत भेदरलेल्या आणि सत्ताभिलाषी व्यवस्थेचे लक्षण आहे. होय, कुणाचेही हेतू राजकीय असतातच आणि असायला हरकतही नाही. पण ते हेतू लोकहितासाठी आहेत की केवळ विशिष्ट गटासाठी किंवा 'आहे रे' स्तरातील लोकांच्या फायद्याचे आहेत हा मूळ प्रश्न आहे."
- सुव्रत जोशी, अभिनेता
------
"महत्त्वाच्या विषयावर अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. लोकांना घाणेरडी सवय लागलेली आहेत? की ज्या विषयात आपल्याला गती नाही, अभ्यास नाही अशा विषयावर बेधडक लोक मतं देतात. शेतकरी आंदोलनावर बोलायचं म्हणजे हे माहिती पाहिजे की ते शेतकरी नेमकं कुठले आहेत? त्यात शेतकरी आहेत की कंत्राटदार आहेत? हे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत? की उत्स्फूर्तपणे आहे? अतीव माहितीमुळे आतून येणाऱ्या गोष्टी कमी आहेत, बाहेरूनच होणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. महाराष्ट्रातले किती शेतकरी आहेत? दक्षिणेतले किती शेतकरी आहेत? जे तिथे आहेत ते नेमके कुठले शेतकरी आहेत? मुळात त्यातले शेतकरी किती आहेत? त्यामुळे मी यावर काय बोलणार? आणि मग असं काहीतरी बोलायचं, पण तेंडुलकर, कोहली जे बोलताहेत तर लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा, याला काही अर्थ आहेत? का? त्यामुळे ज्याने त्याने उठून आपलं मत देऊ नये, मत देण्याआधी त्या गोष्टीचा अभ्यास करावा."
- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते
"मी स्वतः एक शेतकरी आहे. माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. आज गेल्या कित्येक महिन्यांपासून आपलं घरदार, शेती सोडून जर शेतकरी रस्त्यावर बसले आहेत तर खरंच त्यांना काही अडचणी असतील म्हणून बसले आहेत. असंच कुणी इतके हाल नाही? सोसत. विसंवादाचाही मुद्दा आहेच. जो दोन्ही बाजूने होतोय. जे शेतकरी हट्टाने बसले आहेत तो असंतोष आहे हे सरकारच्या लक्षात येत नाहीये का? उलट त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करून हा विसंवाद वाढायलाच खतपाणी मिळतंय. हे कोणतं सरकार आहे जे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ शकत नाही? सामान्य जनतेचा भागच होऊ शकत नाही. उलट शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं जातं. कायदयांना जितका विरोध शेतकरी करत आहेत, तितक्याच तीव्रतेने सरकारची शेतकऱ्यांप्रती वागणूक राहिली तर मार्ग कसा निघेल? सरकार जोपर्यंत केवळ राज्यकर्त्यांच्या भूमिकेत राहतील तोपर्यंत ही दरी कायम राहील. त्यामुळे या शेतकरी आंदोलनाला, माझ्या शेतकरी बापाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे."
- हेमंत ढोमे, अभिनेता
"मला कृषी कायदा नेमका काय आहे याविषयी माहिती नाही. तो जर मला माहित नसेल तर त्यावर बोलणं चुकीचं आहे. यात दोन प्रवाह आहेत, काही सांगताहेत की कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, काही सांगताहेत की जे मोदी विरोधात आहे त्यांनी हे आंदोलन घडवून आणलंय. ज्यामुळे जे आपल्याला धड माहिती नाही त्याविषयी बोलू नये या मताचा मी आहे."
- शरद पोंक्षे, अभिनेता
"मला मनापासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावासा वाटतो. शेती कायदे, त्याच्या योग्य-अयोग्य बाजू यावर मत व्यक्त करावं एवढं माझं ज्ञान नाहीये. याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आपल्या देशातला एवढा मोठा घटक, एवढ्या मोठ्या संख्येने इतके दिवस तिथे ठाण मांडून बसलेला आहे, तर त्यांना सरकार सामोरं जात नाहीये. दुरून केवळ चर्चेच्या फायरी झाडत राहणं आणि ते देशविघातक माणसं असल्यासारखी त्यांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर खिळे लावून रस्ता बंद करणं म्हणजे हे मला खूप दुर्दैवी वाटतं. याउलट या परिस्थितीला आपण मोठेपणानं सामोरं जाऊन खुल्या दिलानं चर्चेचं वातावरण देशात तयार व्हायला हवं."
- सुनील सुकथनकर, दिग्दर्शक