मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय लवकरच होईल : विनोद तावडे, पुण्यात प्रकाशक लेखक संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:29 PM2018-01-19T12:29:17+5:302018-01-19T12:30:40+5:30
राज्य शासनाने मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कार्यवाही केली आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच निर्णय होईल, पण नेमका केव्हा होईल याबाबत सांगण्यास मी सक्षम नाही, असे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
पुणे : मी मराठी भाषेचा पुरस्कर्ता आहे. राज्य शासनाने मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कार्यवाही केली आहे. याबाबतची फाईल केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच निर्णय होईल, पण नेमका केव्हा होईल याबाबत सांगण्यास मी सक्षम नाही, असे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रकाशक-लेखक संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, तामिळनाडू कोर्टात यासंबंधीच्या याचिकेचा निर्णय झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल. मी राज्य कॅ बिनेटचा सदस्य आहे. त्यामुळे यासंबंधी सविस्तर सांगू शकणार नाही.
सीईटीच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, की याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल, नुकसान होणार नाही.
दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूटमधील शिक्षकानी मे महिन्यात आंदोलन करावे, असा अजब सल्ला तावडे यांनी दिला. शैक्षणिक वर्ष सुरू असताना आंदोलन करून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, अन्यथा विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये हलवण्यात येईल, असेही ते म्हणाले
आरटीई प्रवेशावेळी पावती मिळणार
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक शाळा नोंदणी करत नसल्याने प्रवेशांचा प्रश्न निर्माण होतो. यापुढे विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला किंवा घेतला नाही तरी त्यांना पावती देणे बंधनकारक राहणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.