अमराठी मंडळींना लागेना मराठीची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:26+5:302021-02-27T04:14:26+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे गेल्या चार-पाच वर्षांपासून ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ असा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे गेल्या चार-पाच वर्षांपासून ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ असा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. मात्र, या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंंत अभ्यासक्रमाच्या केवळ दोनच तुकड्या पूर्ण झालेल्या आहेत.
विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञ शिक्षक बोलावून ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाही सुरु आहे. अभ्यासक्रमाबद्दलची माहिती अमराठी भाषिकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचत नसल्याने मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असू शकतो, असे सांगितले जाते.
जेमतेम एकदोन राज्यांचा अपवाद वगळता इतर राज्यांमधून मराठी शिकण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. विद्यापीठातील मराठी अभ्यासक्रमाची माहिती मराठीसह इंग्रजी, हिंदी भाषांमधूनही प्रसिध्द झाल्यास विद्यार्थ्यांचा ओघ वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. “ज्या अमराठी भाषिकांना मराठी भाषा शिकायची आहे, त्यांच्यासाठी विद्यापीठाचा मराठी विभाग कायम खुला आहे. त्यांनी प्रवेश घ्यावा,” असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले.
चौकट
“राज्यशास्त्र, अर्थशास्त्राचे पदवीधर मराठी विषयासाठी अर्ज करतात. मात्र, मराठी विषयात बीए, एमए केलेल्यांची संख्या तुलनेने कमी होताना दिसते. दर वर्षी गोव्यातून चार-पाच विद्यार्थी विद्यापीठातील मराठी विभागात प्रवेश घेतात आणि मराठीचे ज्ञान घेऊन आपल्या राज्यात परत जातात.”
- डॉ. प्रभाकर देसाई